Homeक्रीडाशब्दाला जागला हार्दिक पांड्या!

शब्दाला जागला हार्दिक पांड्या!

वर्ल्ड कपसाठी मदत करणा-या वानखेडेच्या ग्राउंड स्टाफला दिले ‘स्पेशल गिफ्ट’

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात षटकारांचा पाऊस पाडणारा हार्दिक पांड्या सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या विजयानंतर हार्दिकने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीने सिद्ध केले आहे की, तो केवळ एक अष्टपैलू खेळाडूच नाही, तर शब्दाला जागणारा माणूसही आहे. वानखेडे स्टेडियमच्या त्या पडद्यामागच्या नायकांसाठी हार्दिकने आपले वचन पूर्ण करत एक खास भेट दिली आहे.

टी-२० वर्ल्डकपच्या तयारीसाठी हार्दिक पांड्या गेल्या काही महिन्यांपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रचंड घाम गाळत होता. अनेकदा सराव करताना रात्रीचे १२ वाजत असत. यावेळी स्टेडियमचे ग्राउंडस्टाफ थकवा विसरून हार्दिकला साथ देत होते. तेव्हाच हार्दिकने या कर्मचा-यांना एक शब्द दिला होता. तुमच्या या कष्टाचे फळ मी तुम्हाला नक्की देईन असे हार्दिकने संपूर्ण ग्राउंडस्फाटला सांगितले होते. गुरुवारी हार्दिकने वानखेडेवर जाऊन या सर्व ग्राउंडस्टाफची भेट घेतली आणि त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवले.

हार्दिकने या कर्मचा-यांना आर्थिक मदत करत भेटवस्तू दिल्या. ज्यावेळी झगमगाटापासून दूर राहून हे कर्मचारी काम करतात, तेव्हा त्यांना स्टार खेळाडूने दिलेली ही पोचपावती भावूक करणारी ठरली. दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या हार्दिकचा आत्मविश्वास सध्या चांगलाच वाढला आहे. आपल्या भविष्यातील लक्ष्याबद्दल बोलताना तो म्हणाला, माझ्यामध्ये अजून १० वर्षांचे क्रिकेट शिल्लक आहे. येणा-या या दशकात भारतीय संघाला १० आयसीसी ट्रॉफी जिंकून देणे, हेच माझे एकमेव ध्येय आहे.

‘लेडी लक’ माहिकाबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
हार्दिकने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील यशाचे श्रेय त्याची गर्लफ्रेंड माहिका हिला दिले आहे. आयुष्यातील चढ-उतारांच्या काळात माहिकाने त्याला खंबीर साथ दिली. हार्दिक भावूक होत म्हणाला, जेव्हापासून माहिका माझ्या आयुष्यात आली आहे, तेव्हापासून फक्त विजयच मिळत आहेत. ती माझ्यासाठी खरी लकी ठरली आहे. गेल्या तीन वर्षांत हार्दिकने तीन आयसीसी स्पर्धांमध्ये जबरदस्त कमबॅक केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR