31.4 C
Latur
Wednesday, April 8, 2026
Homeराष्ट्रीयदेशभरात मुसळधार पावसाचा इशारा

देशभरात मुसळधार पावसाचा इशारा

मान्सूनचे संकेत की वळवाचा तडाखा? हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली/पुणे : मार्चमधील गोंधळात टाकणा-या हवामानानंतर एप्रिलमध्येही देशातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या महिन्यात प्रामुख्याने उत्तर भारतात हवामानाचे विचित्र स्वरूप पाहायला मिळाले. जिथे उंच डोंगराळ प्रदेशात बर्फवृष्टी आणि मैदानी भागात अवकाळी पावसासह गारपिटीने तडाखा दिला. यादरम्यान भारतीय हवामान खात्याने संपूर्ण देशभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार असला तरीही त्याचा मान्सूनशी थेट संबंध नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

एकामागून एक येणा-या तीव्र पश्चिमी विक्षोभांमुळे हवामानात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर तयार झालेले बाष्प आणि वातावरणातील इतर बदलांच्या परस्पर संबंधामुळे देशभरात अवकाळी पाऊस पडत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. यादरम्यान देशाच्या विविध भागांत सुरू असलेल्या पावसामुळे यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याची चर्चा शेतक-यांमध्ये रंगली आहे. मात्र, सध्याचा पाऊस आणि १ जूनच्या सुमारास केरळमध्ये धडकणारा अधिकृत मान्सून यांमध्ये मोठा फरक आहे. सलग दोन पश्चिमी विक्षोभांमुळे हा पाऊस पडत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पश्चिमी विक्षोभ प्रणालीचा उगम अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेपलीकडून होतो. हे वारे भूमध्य समुद्र, काळा समुद्र, कॅस्पियन व अरबी समुद्रातून बाष्प शोषून घेतात आणि उंचीवरून भारतीय उपखंडात दाखल होतात.

उत्तर भारतातील तापमानात मोठी घट
ढगाळ वातावरणामुळे राजधानी दिल्लीतील तापमानात लक्षणीय घट झाली आहे. सततच्या ढगाळ हवामानामुळे ५ एप्रिल रोजी दिल्लीतील कमाल तापमानाचा पारा ३२ अंशाचा खाली आहे, गारव्याचा हा परिणाम इतर राज्यांमध्ये अधिक तीव्रतेने दिसून येत आहे. पंजाबमधील सरासरी कमाल तापमान सामान्यपेक्षा २.६ अंश सेल्सिअसने घसरले. हरियाणातील तापमान सरासरीपेक्षा १.८ अंश सेल्सिअसने कमी नोंदवण्यात आले. ग्वाल्हेर आणि रेवा या भागांत किमान तापमानात २.४ अंश सेल्सिअसपर्यंत मोठी घट झाली.

पावसामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान
हे हवामान कृषी क्षेत्रासाठी मात्र चिंतेचे कारण ठरले आहे. ऐन शेतीच्या हंगामात आलेल्या या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल महिन्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीने महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब व हरियाणातील शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. ऐन काढणीच्या हंगामात आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे गव्हाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजावर आर्थिक संकट ओढवले आहे.

कोणकोणत्या राज्यात पावसाचा इशारा?
पंजाब, हरियाणा, उत्तराखंड व हिमाचल प्रदेशात ताशी ६० ते ७० किमी वेगाने वाहणारे वारे आणि गारपिटीची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचलच्या उंचावरील भागात सुरू आहेत. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून येणा-या बाष्पयुक्त वा-यांमुळे महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांत अधूनमधून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत, तमिळनाडू, केरळ व कर्नाटक या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR