उलानबातार : भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर सध्या दोन दिवसांच्या मंगोलिया दौ-यावर असून भारत-मंगोलिया संबंध अधिक दृढ करण्यावर त्यांचा भर आहे. चीनशी घनिष्ठ आर्थिक आणि व्यापारी संबंध असलेल्या मंगोलियामध्ये भारताचे वाढते अस्तित्व आणि सहकार्य या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
मंगोलियाचे राष्ट्रपती उखना खुरेलसुख यांच्या गेल्या वर्षीच्या भारत दौ-यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती खुरेलसुख यांच्यात झालेल्या चर्चेतील निर्णयांची अंमलबजावणी आणि प्रगतीचा आढावा घेणे, हा या दौ-याचा मुख्य उद्देश असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.भारत आणि मंगोलिया यांच्यातील सहकार्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा मानला जाणारा प्रकल्प म्हणजे डोर्नोगोवी प्रांतातील अल्तानशिरी येथे उभारण्यात येत असलेली तेल रिफायनरी. या प्रकल्पासाठी भारत सरकारने १.७ अब्ज अमेरिकन डॉलर्सची सॉफ्ट लाइन ऑफ क्रेडिट उपलब्ध करून दिली आहे.
हा प्रकल्प भारत सरकारने जगभरात दिलेल्या सॉफ्ट कर्ज सहाय्यांपैकी सर्वात मोठा प्रकल्प मानला जातो. जयशंकर यांनी सांगितले की, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मंगोलियाची इंधन क्षेत्रातील आत्मनिर्भरता वाढण्यास मदत होईल आणि दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत होतील.
भारत-मंगोलिया संबंधांना नवी चालना
दौ-यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना जयशंकर म्हणाले, भारत आणि मंगोलिया हे केवळ रणनीतिक भागीदार नाहीत, तर आध्यात्मिकदृष्टयाही एकमेकांशी जोडलेले आहेत. दोन्ही देशांमधील संबंध हे प्राचीन सांस्कृतिक वारसा, लोकशाही मूल्ये, विकासाची समान आकांक्षा आणि मजबूत जनसंपर्कांवर आधारित आहेत. त्यांनी दोन्ही देशांमधील विविध सहकार्य प्रकल्पांचा आढावा घेतल्याचे सांगितले. विशेषत: विकास भागीदारीच्या क्षेत्रातील प्रकल्पांना गती देण्यावर चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खनिजांचा अफाट साठा
मंगोलिया हा जगातील आघाडीच्या खनिज संपन्न देशांपैकी एक आहे. येथे तांबे, सोने, कोळसा आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित धातूंचे १ हजारांहून अधिक साठे आहेत. मंगोलियाच्या जीडीपीमध्ये आणि एकूण निर्यातीत (जवळपास ९० टक्के) या खनिजांचा मोठा वाटा आहे.
चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न
सध्या मंगोलिया आपल्या खनिजांच्या उत्खननासाठी आणि विक्रीसाठी चीनवर पूर्णपणे अवलंबून आहे. चीन या खनिजांचा मोठा खरेदीदार आहे. अशा परिस्थितीत भारताने तेथे केलेली गुंतवणूक मंगोलियाला चीनच्या प्रभावातून बाहेर पडण्यास मदत करू शकते.
युरेनियम पुरवठ्यावर भारताची नजर
भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी युरेनियमची गरज आहे. भारत आपल्या अणुप्रकल्पांसाठी युरेनियमचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मंगोलियासोबत सातत्याने चर्चा करत आहे. हा करार झाल्यास भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठी ताकद मिळेल.
















