नांदेड : प्रतिनिधी
कौटुंबिक वादातून पत्नीचा डोक्यात कु-हाड मारून खून करणा-या आरोपी पतीस जन्मठेपेच्या शिक्षेसह दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सदर शिक्षा नांदेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
मुदखेड तालुक्यातील तिरकस वाडी येथील आरोपी ज्ञानेश्वर मारुती शिंदे याचे पत्नीसोबत कौटुंबिक भांडण झाले होते. या भांडणातून दि. ९ ऑगस्ट २०२१ रोजी ज्ञानेश्वर याने आपल्या पत्नीच्या डोक्यात कु-हाडीचे घाव घालून खुन केला होता. या प्रकरणी बारड पोलीस ठाण्यात गुरनं ८१/२०२१ नुसार कलम ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सपोनी तुगावे यांनी करून पुराव्यानिशी न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले होते. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. तवशीकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले पुरावे आणि युक्तीवाद ग्रा धरून आरोपी ज्ञानेश्वर मारुती शिंदे यास दोषी धरले.
यानंतर त्यास जन्मठेपेच्या शिक्षेसह दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकारी अभियोक्ता रणजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोहम्मद अब्बास यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून नईम खान, महिला पोलीस अंमलदार आर. व्ही. कळणे यांनी काम पाहिले.
















