32.5 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मी स्वत: आग्रही

ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मी स्वत: आग्रही

मुंबई : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना ठाकरेंकडून आलेल्या लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांनीच शरद पवार यांना उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्याची विनंती केली होती, असा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला. यावर आता खासदार शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पवार यांनी सीएम शिंदेंचा दावा खोडून काढला आहे.

आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये खासदार पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंचा दावा खोडून काढला आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मी स्वत: आग्रही होतो. ठाकरे यांचा हात मीच वर केला होता असा खुलासा करत खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा खोडून काढला आहे.

तसेच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांच्या आरोपांवर बोलताना शरद पवार म्हणाले, दाऊदच्या आरोपांना २५ वर्षे झाली. या आरोपात तथ्य असते तर २५ वर्षे कशी काढली? असा सवाल खासदार पवार यांनी केला. यावेळी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्ष फोडले, फडणवीस यांचा खरा चेहरा समोर आला आहे, अशी टीका पवार यांनी फडणवीस यांच्यावर केली. राजकारणात मतभिन्नता असते. पक्षांना तुम्ही विरोध करु शकता. पण, पक्ष फोडणे काही देवाण- घेवान करुन काही निर्णय करण्यासाठी परिस्थिती निर्माण करणे, हे राजकारणात बसत नाही. त्यांनी पक्ष फोडला हे सांगितले हे बरे झाले. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा समोर आला, असेही शरद पवार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR