38.4 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेषचिरंजीव हनुमान

चिरंजीव हनुमान

हनुमानाचा जन्म जरी वानरीच्या पोटी झाला तरी तो प्रत्यक्ष रूद्र आहे. अंजनी ही वनपरी होती. तिला भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन वर माग, असे म्हणताच ‘तुम्ही माझ्यापोटी जन्माला यावे’ असा वर तिने मागितला. शिवशंकरांनी ‘तथास्तू’ म्हणून तिचे मनोरथ पूर्ण केले. तोच हा वायुपुत्र हनुमान. अत्यंत वेगवान, प्रचंड बुद्धीमत्ता असेलेला हा शिवाचा अवतार. हनुमंतांच्या अवतारकार्याशी अशा अनेक कथा, रूपकं जोडलेली आहेत. प्रभू रामचंद्रांनी आणि सीतेने दिलेल्या आशीर्वादामुळे हनुमानाला चिरंजीवत्व प्राप्त झाले, असे सांगितले जाते.

आपल्या संस्कृतीत चिरंजीव व्यक्तिमत्त्व मान्यता पावलेले आहेत. जसे व्यास, बिभिषण, अश्वत्थामा आणि हनुमान अशी एकूण ११ जणं आहेत. प्रत्येकाच्या कार्याचा आढावा घेतला तर लेखाचा विस्तार वाढेल. आज आपण फक्त चिरंजीव हनुमानाचा विचार करू या! रामभक्त म्हणून ख्यात पावलेला हा हनुमान जणूकाही रामाचा बहीश्चर प्राणंच होय. रामरक्षेतसुद्धा ‘वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये’ असे ज्याचे वर्णन आहे. रामाच्या सर्व भक्तांमध्ये सर्वात प्रिय किंवा ज्याच्या जीवनातला रामच मुळी श्रीराम आहे, तो महाप्राण आहे, असा तो हनुमान चिरंजीव आहे. अमर्याद आहे. नाश न होणारा, न संपणारा आहे. तो बाल ब्रह्मचारी आहे. केवळ राम आणि रामाची सेवा असा त्याचा निर्धार आहे, असा तो हनुमान. हनुमानाचा जन्म जरी वानरीच्या पोटी झाला तरी तो प्रत्यक्ष रूद्र आहे. अंजनी ही वनपरी होती. तिला भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन वर माग, असे म्हणताच ‘तुम्ही माझ्यापोटी जन्माला यावे’ असा वर तिने मागितला. शिवशंकरांनी ‘तथास्तू’ म्हणून तिचे मनोरथ पूर्ण केले. तोच हा वायुपुत्र हनुमान. मनाच्या वेगाप्रमाणे त्याच्या हालचालींना वेग आहे. अत्यंत वेगवान, प्रचंड बुद्धीमत्ता असेलेला हा शिवाचा अवतार. याच्या जन्माच्या कथा अत्यंत रोचक आहेत. लहान मुलांना तसेच मोठ्यांना पण आवडतात. तो गावाचा रक्षणकर्ता आहे. प्रत्येक गावात वेशीवर हनुमंताचे मंदिर असते.

भागवतात एक सुंदर कथा आहे. भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी एकदा एकांतात असताना नारद मुनी तिथे आले. त्या दोघांना एकत्र हास्य विनोदात रमलेले पाहून ब्रह्मर्षी नारद यांच्याही मनात विवाहाचा विचार आला आणि त्यांनी आपली मनोकामना भगवात विष्णूंजवळ बोलून दाखविली. मनातल्या मनात श्री विष्णंूनी त्यांचे मन जाणले आणि तथास्तू म्हणाले. कालांतराने एका राजकन्येच्या स्वयंवराचे आमंत्रण आले. तेव्हा नारदांना पाठवायचे ठरले. श्री विष्णूंनी स्वत: नारदामुनींना तयार केले. स्वयंवराला पोहोचताच सर्व सभा नारदमुनींना पाहून हसू लागली. ते पण हसत होते; पण कारण कळेना. राजकन्या जेव्हा जवळ आली तेव्हा तिलाही हसू आवरेना. क्षणार्धात काय प्रकार आहे ते ब्रह्मर्षींच्या ध्यानात आले. ते तात्काळ तेथून निघून गेले. श्री विष्णूंकडे आले. त्यांनी जाब विचारला, देवा नारायणा काय केलेत हे? का असा माझा कायापालट केला? असे मला का सजवले? क्रोधीत होऊन नारदमुनींनी श्री विष्णूंना शाप दिला. आज मला जे तुम्ही रुप दिले वानराचे तेच तुम्हाला मदत करतील. जेव्हा तुम्ही रामावतार घ्याल तेव्हा पत्नीचा वियोग झाल्यावर तिचा शोध घेताना माझ्या अशा रुपातील प्राणीच तुमची मदत करतील आणि त्याची प्रचिती आपल्याला रामायणात अनुभवायला मिळते. काही तरी पूर्वसंकेत असतात तेव्हा आपल्यालाच नाही तर देवांनाही मोह होतो. नाही तर ब्रह्मर्षी नारदमुनींना संसारसुखाचा मोह का व्हावा? हनुमनांच्या अवतारकार्याशी अशा अनेक कथा, रुपकं जोडलेली आहेत. ती वाचताना, संदर्भ पाहताना त्यांच्या संपूर्ण कार्याचा व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेता येतो.

रामायण काळात प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला सीतेचा शोध घेण्यासाठी पाठवले होते. सीतामातेचा शोध घेत जेव्हा मारुतीराया लंकेमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी सीतेला श्रीरामांनी दिलेला संदेश सांगितला त्यामुळे प्रसन्न होऊन सीतेने हनुमंताला अजरामर म्हणजेच चिरंजीव राहण्याचे वरदान दिले, असे सांगितले जाते तर दुस-या एका आख्यायिकेनुसार रामायणाच्या अखेरीस प्रभू रामचंद्रांजवळ वर मागताना हनुमानाने प्रार्थना केली आणि म्हणाला, ‘माझे प्रेम आणि भक्ती सदैव आपल्या ठायी राहावी. माझ्या अंत:करणाचा भाव अन्यत्र कधीही न वळावा. जोवर रामकथा जगात राहतील तोवर माझे शरीर जीवंत राहावे आणि मी जीवंत असेपर्यंत आपल्या भक्तांनी आपले चरित्र मला ऐकवत राहावे, अशी माझी इच्छा आहे.’ त्यांचे हे शब्द ऐकून प्रभू रामचंद्रांनी आपल्या परमप्रिय भक्ताला आलिंगन दिले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल, असा आशीर्वाद दिला. श्रीरामांच्या वरप्रसादामुळेच हनुमान चिरंजीव झाला आणि सप्तचिरंजीवात त्याची गणना होऊ लागली. तसे पाहता हनुमान शक्तीची देवता आहे. मनाची देवता आहे. बलवृद्धीसाठी मारुती स्तोत्र वाचावे तर मनाच्या वाढीव शक्तीसाठी, एकाग्रतेसाठी हनुमान चालीसा पठण करावी, असे संकेत आहेत. काही ठिकाणी ग्रामदेवता म्हणूनदेखील हनुमानाची पूजा भक्ती केली जाते. लहान मुलांपासून वयस्कर लोकांना हनुमानाच्या रुपाचे अप्रूप असते.

असे म्हणतात की, हनुमान ही लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. आजही हिमालयाच्या गुहामध्ये त्यांचा वास आहे, अशी अनेक भक्तांची धारणा आहे. तेथील कित्येकांना हनुमंताने प्रत्यक्ष दर्शनदेखील दिलेले आहे, असे सांगितले जाते. समर्थ रामदास स्वामींचा बलशक्तीवर अपार विश्वास होता त्यामुळे त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी श्री हनुमानाची मंदिरे उभारलेली आहेत. महाभारतात भीमाचे गर्वहरण श्री हनुमानाने केल्याचे सांगितले जाते. लहानपणी दासनवमीच्या उत्सवात ऐकलेल्या हनुमानाच्या कथा आठवणीत आहेत. त्यातील एक आठवण पक्की मनात आहे. कीर्तनकार बुवांनी सांगितले होते की, रात्री १२ वाजता मोकळ्या मैदानावर मोठ्याने ११ वेळा मारुती स्त्रोत्र म्हटले तर प्रत्यक्ष हनुमान आपल्याला दर्शन देतो. आजही ते कुतुहल मनाच्या तळाशी आहे; पण अजूनही ती हिम्मत येत नाही प्रचिती घेण्याची!

चिरंजीव महाप्राण हनुमान! केवळ रामभवनातच नाही तर बरेच काही पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहेत. बालवयात हनुमान अतोनात खोडकर होते. हनुमानाच्या बाललीला प्रसिद्ध आहेत. त्यात नकळत्या वयात घडलेल्या एका चुकीची शिक्षा म्हणून तुला तुझ्या बळाचा विसर पडेल. कोणी तरी आठवण करून दिल्याशिवाय तुला जाणीव होणार नाही, असा शाप त्यांना मिळाला होता. म्हणूनच लंकेच्या दुस-या तीरावर पोहोचल्यावर समुद्र कसा ओलांडायचा, हा विचार श्रीरामांचा सुरू असताना अंगदाने हे काम हनुमान करू शकतील फक्त त्यांना त्यांच्या बळाची जाणीव करून द्यावी लागेल, असे सांगितले आणि ते काम अंगदाने केले. यानंतर मग हनुमान आकाश मार्गाने लंकेला जाऊ शकले. अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे, तयासि तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे! असे ज्यांचे वर्णन रामदास स्वामींनी केलेले आहे. असा हा चिरंजीव हनुमान! आपल्या सर्वांच्या परिचयाचा तर आहेच आहे शिवाय तो संकटहर्ता, दु:खहर्ता आहे. मनाची शक्ती वाढविणारा आहे. चिरंजीव म्हणजे चिरंवत, नित्य अपरिर्वतनिय! नद्या पर्वत जसे कायमस्वरूपी असतात. कालांतराने त्यांची झीज होते हे जरी खरे आहे. ते नित्य चिरंतनच आहे. आपले जे ११ चिरंजीव आहेत ते तसेच आहेत. त्यांना अन्त नाही. जगाच्या कल्याणासाठी या विभूती आहेत. म्हणूनच आजकाल हनुमान जयंती न म्हणता हनुमान जन्मोत्सव असे म्हटले जाते. ही आपल्या हिंदू धर्माची भावना आहे.

-अरुणा सरनाईक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR