29.5 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeसंपादकीयप्रेरणागीत वादात !

प्रेरणागीत वादात !

शिवसेना ठाकरे गटाच्या ‘शंखनाद होऊ दे, रणदुदुंभी वाजू दे, नादघोष गर्जू दे विशाल’ या मशाल गीतात फक्त एकदा ‘जय भवानी’ व ‘हिंदू’ हा शब्द वापरण्यात आला आहे त्यावरून आयोगाने ठाकरे गटाला नोटीस बजावली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी हे शब्द काढणार नाही, अशी भूमिका घेत उलट आयोगालाच आव्हान दिले आहे. प्रसंगी या प्रकरणी आम्ही न्यायालयातही जाऊ, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल गीतातील ‘जय भवानी’ व ‘हिंदू’ हा शब्द कोणत्याही परिस्थितीत वगळणार नाही. ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही आमची घोषणा आहे. आज ‘जय भवानी’ हा शब्द काढायला सांगताय उद्या ‘जय शिवाजी’ हा शब्द काढायला सांगाल. ते अजिबात खपवून घेणार नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी निवडणूक आयोगाला ठणकावले. कारवाई करायची असेल तर आधी ‘बजरंग बली’च्या नावाने मते मागणा-या पंतप्रधान मोदींवर करा, रामलल्लाचे मोफत दर्शन देण्याचे आश्वासन देणा-या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर करा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी आयोगाला दिले आहे. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. त्यावर आधारित पक्षाने ६० सेकंदाचे ‘शंखनाद होऊ दे’ हे प्रचारगीत तयार केले आहे.

या मशाल गीतामध्ये ‘जय भवानी’ व ‘हिंदू’ शब्द असल्याने निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. धर्माच्या आधारावर प्रचार असा आक्षेप या संदर्भात घेण्यात आला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उलट निवडणूक आयोगालाच आव्हान दिले. या वेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांमधील भाषणांची क्लिप पत्रकारांना ऐकवली. मध्य प्रदेश निवडणुकीच्या वेळी ‘बजरंग बली’च्या नावावर मत द्या, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. या शिवाय आम्हाला मत दिल्यास रामलल्लाचे मोफत दर्शन, असे अमित शहा जाहीर सभेत बोलले होते. निवडणुकीत धर्माच्या मुद्यावर प्रचार करणे नियमांच्या विरुद्ध आहे. असे असताना मोदी आणि शहा हिंदुत्वाचा प्रचार करीत आहेत. त्याची तक्रार पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती मात्र, त्याबाबत अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. धर्माच्या नावाखाली प्रचार केल्या प्रकरणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक आयोगाने ६ वर्षांसाठी मतदान करण्यावर तसेच निवडणूक लढविण्यावर बंदी घातली होती, याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी करून दिली. आम्ही मोदी-शहा यांच्याबाबत तक्रार करूनही काहीही उत्तर आले नाही.

यावर निवडणूक आयोगाने उत्तर न दिल्यास नियम बदलला आहे, असे आम्ही समजू आणि आम्हीदेखील असा प्रचार केला तर तुम्हाला कारवाई करता येणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या या युक्तिवादाला खोडून काढणे आयोगाला जमणार नाही हे उघड आहे. ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात आहे. आम्ही गाण्यातील ‘जय भवानी’ शब्द काढणार नाही. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या कुलदेवतेचा अपमान केल्याचा आरोप केल्यास आयोगाकडे याचे उत्तर आहे काय? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. मोदी-शहा देवाच्या नावावर मते मागतात त्यांच्यावर कारवाई का नाही? या बिनतोड सवालाचे उत्तर निवडणूक आयोगाकडे खचितच नसणार! आयोगाचे नियम सर्वांसाठी समान असायला हवेत; परंतु तसे होताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे अनेकदा अत्यंत वादग्रस्त विधाने करतात आणि नंतर माफीही मागतात. सध्या त्यांचे सारे लक्ष पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती मतदारसंघातून विजयी करण्याकडे आहे.

त्यासाठी ते पुणे जिल्ह्यात सतत सभा घेत आहेत. या सभांमधून ते अप्रत्यक्षपणे धमकावताना दिसले. मी पाहिजे तेवढा निधी देतो; पण मशिनमध्ये माझ्यासाठी कचाकचा बटण दाबा म्हणजे निधी द्यायला मला बरे वाटेल… नाही तर मी हात आखडता घेईन, या त्यांच्या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली; परंतु निवडणूक आयोगाला ती दिसली नाही! उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित दादांच्या वक्तव्यावर कठोर टीका करताना म्हटले की, अजित पवार स्वत: व्यापारी आहेत त्यामुळे ते सौदा करणारच. आपला देशच एक व्यापारी चालवतो आहे त्याने ठिकठिकाणी असे एजंट नेमले आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची निशाणी पण गेली. त्यांना धनुष्य-बाण सोडून मशाल हाती घ्यावी लागली. आता मशाल गीतावरून निवडणूक आयोगाने त्यांना कोंडीत पकडले आहे. मशाल गीतातील ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू’ शब्दावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिले आहे. आई तुळजाभवानी महाराष्ट्राचे कुलदैवत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानीचा आशीर्वाद होता. भवानी तलवारीचा प्रसंग सा-यांच्या हृदयात कोरला गेला आहे. ‘जय भवानी, जय शिवाजी’ हा जयघोष राज्यातील जनता रोज करते त्यामुळे आम्ही जय भवानी असो की हिंदू हे शब्द कोणत्याही परिस्थितीत हटवणार नाही. जे लोक हिंदू धर्माच्या नावाने मते मागतात त्यांच्यावर कारवाई होत नाही. आम्ही काही हिंदू धर्माच्या नावाने मते मागितली नाहीत आणि जर कारवाई करायचीच असेल तर आधी मोदी-शहा यांच्यावर करा मग आमच्यावर. एकूण वस्तुस्थिती लक्षात घेता आयोगाला उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करणे अवघड जाईल. राजकीय नेत्यांनी प्रचारात राजकीय नितीमत्तेला तिलांजली देत आचारसंहितेची ‘ऐशी की तैशी’ करून सोडली आहे. राजकीय नेत्यांची दादागिरीची विधाने निवडणुकीचे पावित्र्य धोक्यात आणणारी आहेत त्याला आयोग आवर कसा घालणार? मत दिले तरच निधी देणार, असे म्हणणे म्हणजे निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची खिल्ली उडविण्यासारखे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR