नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत गेल्या तीन आठवड्यांपासून सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टी संघटनेचे आंदोलन आणि पर्यावरणविषयक मुद्यांचे पुरस्कर्ते सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणामुळे वातावरण तापले आहे. नीट पेपर फुटीमुळे झालेल्या गोंधळाची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीसह सोनम वांगचुक यांनी केली असून त्याचसाठी वांगचुक बेमुदत उपोषणाला बसले होते. शनिवारी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात दाखल केले. यानंतर माध्यमांशी बोलताना अभिजित दिपके यांच्यावर एका महिलेने शाईफेक केली असून त्यांचे नाव बरखा त्रेहन असल्याची माहिती समोर आली आहे.
अभिजित दिपकेंवर शाईफेक
सोनम वांगचुक यांना शनिवारी भल्या सकाळी पोलिस प्रशासनाने सक्तीने आंदोलन स्थळावरून उचलून नेले. यानंतर त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंदर्भात जंतर-मंतरवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर एका महिलेने गर्दीतून येऊन शाईफेक केली. त्यानंतर तात्काळ बरखा त्रेहन यांना सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी तिथून बाजूला नेले. त्यांनी दिपकेंवर शाईफेक का केली? याचे कारण तात्काळ समोर येऊ शकले नसले, तरी नंतर पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये या गोष्टीचा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने अभिजित दिपके माध्यमांसमोर भूमिका मांडत असताना बरखा त्रेहन या कुणाच्याही नकळत त्यांच्या जवळ पोहोचल्या आणि त्यांनी दिपकेंवर निळ्या रंगाची शाई फेकली. झाल्या प्रकारामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी लागलीच बरखा त्रेहन यांना तिथून हलवून संसद मार्ग पोलिस स्थानकात नेले.
















