इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ४८ तासांच्या आत तुरुंगातून इस्लामाबादमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत. इम्रान खान मागील तीन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असून, त्यांच्या खालावलेल्या तब्येतीबद्दल सातत्याने अफवा पसरत असताना न्यायालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
सरकारचे सर्व आक्षेप फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना पुढील ४८ तासांच्या आत ‘शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटल’मध्ये हलवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्यावर पुढील महिनाभर म्हणजेच १६ सप्टेंबरपर्यंत तिथेच उपचार करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथक नेमण्यात येणार असून, यामध्ये खान यांचे वैयक्तिक डॉक्टर आणि त्यांची बहीण डॉ. अलीमा खान यांचा समावेश असेल.
इम्रान खान यांचे निकटवर्तीय आणि सल्लागार झुल्फिकार अली बुखारी यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. हा निर्णय आणखी आधी आला असता तर त्यांच्या प्रकृती इतकी खालावली नसती. अडियाला तुरुंग प्रशासनाने सोमवारी ७३ वर्षीय इम्रान खान यांच्या प्रकृतीबाबत सकारात्मक दावा केला होता. उपचारांनंतर त्यांच्या डोळयांची दृष्टी सुधारली असून ती आता ‘जवळपास सामान्य’ असल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, खान यांच्या पक्षाने आणि कुटुंबीयांनी या दाव्यावर संशय व्यक्त केला होता.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या वकिलांनी सांगितले होते की, इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी जवळपास ८५ टक्क्यांनी कमी झाली आहे. न्यायालयात सादर केलेल्या वैद्यकीय अहवालात मात्र त्यांच्या प्रकृतीचे गंभीर चित्र समोर आले. त्यानुसार, इम्रान खान यांच्या रक्तदाबात चढ-उतार होत असून हृदयाचे ठोके अनियमित होणे आणि तीव्र मानसिक तणावाचा सामना ते करत असल्याचे उघड झाले आहे.
















