नवी दिल्ली : एक २६ वर्षीय तरुण रुग्ण दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या आपत्कालीन शाखेत वारंवार उलट्या आणि पोटदुखीची तक्रार घेऊन येत होता. त्याला काहीही खायला जमत नव्हते. ओपीडीतील वरिष्ठ डॉक्टर तरुण मित्तल यांनी त्यांचा तपास अहवाल पाहिल्यावर ते अक्षरश: थक्क झाले. कारण रुग्णाच्या आतड्यांमध्ये ३९ नाणी आणि ३७ चुंबकाचे तुकडे सापडले होते. मात्र, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून रुग्णाचे प्राण वाचवले.
लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. तरुण मित्तल म्हणाले, कुटुंबीयांनी रुग्णाच्या पोटाचा एक्स-रे काढला. ज्यामध्ये नाणी आणि चुंबक यांसारख्या वस्तू दिसत होत्या. पोटाचे सीटी स्कॅन केले असता नाणी आणि चुंबकाच्या ओझ्यामुळे आतड्यांमधला अडथळा दिसला. रुग्णाला ताबडतोब शस्त्रक्रियेसाठी तयार करण्यात आले. या वेळी लहान आतड्यात दोन वेगवेगळ्या आतड्यांमध्ये चुंबक आणि नाणी असल्याचे समोर आले. चुंबकीय प्रभावाने ते नष्ट केले.
डॉक्टरांनी सांगितले की, या तरुणाचा असा विश्वास होता की नाण्यांमध्ये जस्त असते, जर त्याने नाणी गिळली तर, त्याला त्याची बॉडी बनवणे सोपे होईल. नाणी पोटात एकाच जागी राहून शरीराच्या इतर भागाला इजा होऊ नये म्हणून हा तरुण चक्क चुंबक गिळत होता.
शरीरातील झिंक वाढवण्यासाठी नाणी गिळली
यानंतर रुग्णाच्या पोटाची तपासणी केली असता नाणी आणि चुंबकांचा मोठा साठा आढळला. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून एकूण ३९ नाणी (१, २, ५ रुपयांची नाणी) आणि ३७ चुंबक काढले. उपचारानंतर रुग्णाला सात दिवस देखरेखीखाली ठेवल्यानंतर घरी सोडण्यात आले. चौकशीत रुग्णाने सांगितले की, शरीरातील झिंकचे प्रमाण वाढवण्यासाठी त्याने नाणी गिळली. नाण्यांमध्ये जस्त असते आणि त्याने चुंबक गिळले जेणेकरून नाणी आतड्याला चिकटून राहतील आणि अधिक जस्त शोषून घेता येईल.