पिथौरागढ : उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून ६ वर्षांनंतर भारत-तिबेट पारंपरिक व्यापार शनिवारी पुन्हा सुरू झाला आहे. पहिल्या पथकात १६ भारतीय व्यापारी आणि ४ मदतनीस तिबेटमधील तकलाकोट मंडीत पोहोचले.
विशेष बाब म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच भारतीय व्यापारी सामानाशिवाय चीनमध्ये गेले. सीमेवर चिनी प्रशासनाने त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यांना प्रवेश दिला, तर व्यापा-यांचे सामान अजूनही पिथौरागढच्या गुंजी येथे ठेवलेले आहे. त्याचबरोबर, २०१९ पासून भारतीय व्यापा-यांचा कोट्यवधी रुपयांचा मालही तकलाकोटमध्ये अडकलेला आहे. पहिल्यांदाच व्यापारी सामानाशिवाय सीमा पार पोहोचले. कोरोना महामारी आणि भारत-चीन संबंधांमधील कटुतेमुळे २०२० पासून दोन्ही देशांमधील पारंपरिक व्यापार पूर्णपणे बंद होता. या वर्षी जूनमध्ये व्यापार सुरू होणार होता, परंतु औपचारिकता आणि चीनकडून सतत बदलणा-या नियमांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली जात राहिली. ८ जुलै रोजी व्यापारी सामान घेऊन गुंजीपर्यंत पोहोचले होते. त्यांना ट्रेड पासही जारी करण्यात आले होते, परंतु निघण्यापूर्वी एक दिवस आधीच चीनच्या पुरांग काउंटी प्रशासनाने व्यवस्था पूर्ण नसल्याचे कारण देत व्यापा-यांची एंट्री थांबवली. त्यानंतर व्यापारी आपले सामान गुंजीमध्ये सोडून परत धारचुला येथे परतले.
सध्या फक्त २० लोकांना मंजुरी
व्यापार सुरू होण्याबाबत सीमावर्ती भागातील व्यापा-यांमध्ये खूप उत्साह होता. प्रशासनाने १३४ व्यापारी आणि त्यांच्या सहायकांसाठी ट्रेड पास जारी केले होते. मात्र, नंतर चीनकडून नवीन आदेश जारी करण्यात आला आणि सध्या केवळ २० लोकांनाच तकलाकोटला जाण्याची परवानगी देण्यात आली. चिनी प्रशासनाने स्पष्ट केले की, पहिल्या टप्प्यात केवळ त्याच व्यापा-यांना प्रवेश मिळेल, जे २०१९ मध्ये तकलाकोटला गेले होते आणि ज्यांचा माल तिथे राहिला होता.
भारत-चीन व्यापार विधिवत सुरू
धारचूलाचे एसडीएम आणि व्यापार अधिकारी आशिष जोशी यांनी सांगितले की १ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १०:१५ वाजता लिपुलेख खिंडीतून भारत-चीन पारंपरिक व्यापाराची औपचारिक सुरुवात झाली. पहिल्या पथकात १६ व्यापारी आणि ४ मदतनीस, असे एकूण २० लोक तकलाकोट मंडीत पोहोचले आहेत. तिथे ते व्यावसायिक उपक्रम सुरू करतील. त्यांनी सांगितले की, पुढील तुकड्यांना पाठवण्याची तारीख निश्चित करण्यासाठी चिनी प्रशासनाशी ईमेलद्वारे सतत पत्रव्यवहार केला जात आहे.
गुंजीमध्ये गूळ, खडीसाखर आणि भांडी
व्यापा-यांचा गूळ, खडीसाखर, भांडी यासह इतर व्यापारी माल अजूनही गुंजीमध्ये ठेवलेला आहे. तकलाकोटमध्ये व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर व्यापारी पुन्हा सामान घेऊन जातील, असे सांगितले जात आहे. जर सर्व काही सामान्य राहिले, तर पुढील काही दिवसांत २०-२० व्यापा-यांची इतर पथकेही चीनला रवाना केली जातील.
















