पुणे : प्रतिनिधी
देशात प्रथमच उच्च शिक्षणामध्ये केलेला प्रयोग म्हणजे ‘जीवन परिवर्तन केंद्र’ (लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर) याची उभारणी दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे करण्यात आली आहे. स्व. ऊर्मिला वि. कराड यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर (एलटीसी)चे उद्घाटन १२ मार्च रोजी होणार आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील, अशी माहिती एलटीसीचे संकल्पक व निर्माते युवा शिक्षणतज्ज्ञ डॉ. राहुल वि. कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
एलटीसीच्या उद्घाटनप्रसंगी पतंजली योगपीठाचे संस्थापक व आध्यात्मिक गुरू स्वामी रामदेव बाबा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कृषी(शेती)आणि प्रकृति, शारीरिक स्वास्थ्य आणि खेळ, संघ निर्माण आणि नेतृत्व, देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण व अध्यात्म आणि शांती या ५ स्तंभांवर आधारित या केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक आरोग्य जोपासण्याबरोबरच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याचा हा शैक्षणिक क्षेत्रातील प्रयोग आहे.

