मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात सध्या उष्णतेचा पारा झपाट्याने वाढत चालला आहे. होळी सण पार पडल्यानंतर तापमानात आणखी वाढ झाली आहे. सोमवारी ९ मार्च रोजी हवामान खूप गरम होते. दुपारच्या वेळी सूर्याचा प्रकोप जाणवला. राज्याचे कमाल तापमान सुमारे ४१ अंश सेल्सियसच्या वर गेले आहे. त्यामुळे उष्णतेची तीव्रता जास्त जाणवू शकते. नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
जास्त वेळ उन्हात राहिल्यास उष्माघात, डोकेदुखी किंवा चक्कर येण्यासारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे बाहेर पडताना टोपी, छत्री किंवा स्कार्फचा वापर करावा. हलके आणि सैल सूती कपडे घालावेत. दिवसभर पुरेसे पाणी पिणे, लिंबूपाणी, ताक किंवा नारळपाणी पिणेही आरोग्यासाठी चांगले ठरेल. लहान मुले, वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
वारंवार पाणी पिणे आवश्यक
दुपारच्या वेळेत शक्यतो घरात किंवा सावलीत राहण्याचा प्रयत्न करावा. बाहेर काम करणा-या लोकांनी मध्ये मध्ये विश्रांती घ्यावी. तसेच उन्हात जास्त वेळ राहिल्यास डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगलचा वापर करावा. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी वारंवार पाणी पिणे आवश्यक आहे.

