श्रीक्षेत्र माहूर : प्रतिनिधी
घनदाट जंगल भागात असलेल्या मौजे महादापूर हिंगणी शिवारात चरत असलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना दि. ११ जुलै रोजी घडल्याने परिसरातील शेतकरी, मजूरदार वर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी शेतीची कामे ठप्प झाली आहेत.
मौजे महादापूर येथील शेतकरी गोविंद भारत राठोड यांचे शेत सर्वे क्रं. ९७ मौजे हिंगणी शिवारात आहे. येथील शेतात त्यांनी चरण्यासाठी गायीला सोडले होते. सायंकाळी ४.३० च्या सुमारास अचानक मागून येऊन बिबट्याने गायीवर हल्ला ठार केले. मौजे हिंगणी गावातील एक बोकड आणि मोकाट कुत्रा दोन दिवसा आधीच बिबट्याने फस्त केला होता. यानंतर गायीवर हल्ला केल्याने हिंगणी महादापूर परिसरात दहशत पसरली आहे. वन विभागाने अद्याप कुठलीच कारवाई केली नसल्याने बिबट्या मोकाट फिरत आहे.
















