नांदेड : प्रतिनिधी
नांदेड शहरात खुनाची मालिका सुरूच असून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाघी रस्त्यावर आणखी एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे नांदेड शहर पुन्हा हादरले आहे. दुचाकीवरून आलेल्या ४ हल्लेखोरांनी मित्रांसोबत थांबलेल्या ४२ वर्षीय व्यक्तीवर आधी गोळीबार केला. यानंतर धारधार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान ही घटना जुन्या वादातून घडली असल्याचे पुढे येत असून ४ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
नांदेड शहरात मागील काही महिन्यांपासून गँगवार, खुनांच्या घटना, जीवघेणे हल्ले अशा गंभीर घटनांची मालिका सुरू आहेत. यात शनिवारी मध्यरात्री झालेल्या खुनाच्या घटनेने नांदेड पुन्हा हादरले आहे. मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान शेख शमीम शेख इसाक हे आपल्या मित्रासोबत वाघी रस्त्यावरील एका पान टपरीजवळ ओट्यावर बसले होते. त्याचवेळी दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ येऊन परिसरातील दर्गाचा पत्ता विचारला. शेख शमीम हे पत्ता सांगत असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्यावर अनेक वार केले.
गंभीर अवस्थेत तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना रविवारी पहाटे ५ च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान हा खून दर्गा आणि मशिदीच्या व्यवस्थापनावरून आरोपींशी असलेल्या जुन्या वादातून करण्यात आला असे नमुद करत मयताचे भाऊ आणि तक्रारदार शेख वसीम शेख इसाक यांच्या तक्रारीवरून ४ संशयीतावर गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
















