नांदेड : नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज ४ जून रोजी संपली आहे. या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र आता स्पष्ट झाले आहे. आजच्या माघारीच्या सत्रानंतर भारतीय जनता पक्षाचे अमरनाथ राजूरकर, शिवसेना (उबाठा) गटाचे कृष्णा पाटील आष्टीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचालींना वेग आला होता. या निवडणुकीसाठी एकूण आठ उमेदवारांचे १७ अर्ज वैध ठरले होते, मात्र माघारीच्या मुदतीपर्यंत काही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे रिंगणातील मुख्य स्पर्धकांचे नाव समोर आले आहे.
भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात असून त्यांना महायुतीमधील घटक पक्षांचे समर्थन आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या वतीने कृष्णा पाटील आष्टीकर यांनी आपली दावेदारी कायम ठेवली आहे, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशांत इंगोले यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.
आजची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता प्रचाराचा धुरळा उडणार असून राजकीय पक्षांनी मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
















