नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यात डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे डिझेल टंचाईचे संकट आणखी गडद झाले आहे. तर शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर नो डिझेल स्टॉक असे फलक झळकत आहेत. या टंचाईमुळे वाहनधारकांना रिकामे हात हलवत परतावे लागत आहे. यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत.
गेल्या आठवडा भरापासून शहरातील बहुतांशी पेट्रोल पंपावर डिझेल टंचाई जाणवत आहे. तशा पाट्याही पंपाच्या गेटवर लावण्यात आल्या आहेत. यामुळे वाहनधारकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. शहरातील आयटीआय, नवा मोंढा, हिंगोली गेट, श्रीनगर, चैतन्यनगर, तरोडा नाका, रेल्वेस्थेशन भागातील अनेक पंपावर नो डिझेल स्टॉक असे फलक झळकत आहेत. ही टंचाई कृत्रिम आहे की पॅनिक खरेदी होत आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी महसूल व पोलिस प्रशासन यांचे संयुक्त पथक पेट्रोल पंपावर नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून नेमके काय वास्तव आहे, हे पुढे येणार आहे.
















