काठमांडू : वृत्तसंस्था
नेपाळमधील बालेन सरकारने भारतीय नागरिकांसाठी नवा नियम लागू केला आहे. आता नेपाळमध्ये जाणा-या भारतीय नागरिकांकडे ओळखपत्र असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच नेपाळमधून भारतात येणा-यांनाही आपले परिचय पत्र दाखवावे लागणार आहे. आधार कार्ड किंवा सरकारने जारी केलेले इतर कोणतेही वैध ओळखपत्र यासाठी ग्राहय धरले जाईल. नेपाळ प्रशासनाने शनिवारपासून (दि. ९ मे) या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
नवा नियम लागू झाल्यानंतर शनिवारी जोगबनी येथील भारत-नेपाळ सीमेवर दिवसभर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. ओळखपत्रांच्याह्या सखोल तपासणीमुळे सीमेवर वाहनांच्या आणि पादचा-यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोलकाता येथून येणारी ट्रेन जोगबनी स्टेशनवर पोहोचताच मोठ्या संख्येने प्रवासी नेपाळला जाण्यासाठी सीमेवर पोहोचले. मात्र, नेपाळ पोलिसांकडून ओळखपत्र तपासल्यानंतरच लोकांना प्रवेश दिला जात होता. ज्यांच्याकडे वैध ओळखपत्र नव्हते, त्यांना सीमेवरूनच परत पाठवण्यात आले.
जमुनहा गावात तणावाचे वातावरण
नेपाळचे प्रमुख जिल्हाधिकारी युवराज कटेल यांनी स्पष्ट केले की, सीमा ओलांडण्यासाठी ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल. दुसरीकडे, बहराइचला लागून असलेल्या नेपाळच्या सुमारे १७ किलोमीटरच्या सीमा पट्टीत मोठ्या संख्येने मधेशी समुदाय राहतो. नेपाळी क्षेत्रातील जमुनहा गावात या निर्णयामुळे तणावाचे वातावरण असल्याचे समजते. नेपाळी आर्म्ड पोलिस फोर्सचे जवान येणा-या-जाणा-यांची चौकशी आणि तपासणीच्या नावाखाली कडक पावले उचलत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
चिनी घुसखोरीच्या शक्यतेने पोलिस अलर्टवर
नेपाळ सीमेवरून चिनी नागरिकांच्या घुसखोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती जिल्ह्यातील पोलिस आणि ‘एसएसबी’ला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिहारमधील बेतिया, पूर्व चंपारण, सीतामढी, दरभंगा, मधुबनी यांसह उत्तर बिहारमधील इतर जिल्ह्यांतील पोलिसांना भागातील सर्व प्रमुख हॉटेल्स आणि लॉजची नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तीन दिवसांपूर्वी अररियाच्या जोगबनी बॉर्डरवरून भारतात घुसलेल्या एका चिनी नागरिकाला वैध कागदपत्रांशिवाय पकडण्यात आले होते. या घटनेनंतर पोलिस मुख्यालयाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

