जळगाव : ‘ऑपरेशन टायगर’मुळे धाकधूक वाढली आहे. या ऑपरेशनची दिवसागणिक नवनवीन माहिती समोर येत आहे. त्याचवेळी बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गटाचा योग साधल्याचा दावाही समोर येत आहे. आज योग दिन आहे. मंत्री गिरीश महाजन हे त्यात सहभागी झाले. सध्याच्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याचवेळी त्यांनी ठाकरेंना एक मोठा सल्लाही दिला आहे.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायला कुणीच तयार नाही, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आता घराबाहेर पडलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला. त्यांनी घरात बसून त्यांचा पक्ष वाढणार नाही. त्यांनी केवळ बंडखोर खासदारांच्याच मतदारसंघाचा नाही तर सर्व महाराष्ट्राचा दौरा करावा असे महाजन म्हणाले. गिरीश महाजन यांच्यावर संजय राऊत यांनी गेल्या दोन दिवसांत टीका केली. त्यानंतर आज गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसते.
त्यानंतर या सर्व फुटीचा राग संजय राऊत यांनी महाजनांवर काढला. टीका करताना राऊतांची जीभ घसरली. लोक त्यांना मावशी म्हणतात असा जहरी टोला त्यांनी लगावला. तर जामनेरची मावशी असा उल्लेख करत राऊतांनी महाजनांवर तिरकस बाण सोडले. एक दिवस ईडी आणि सीबीआय जर माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी गिरीश महाजन यांनाच फोडून दाखवेन असा संताप राऊतांनी व्यक्त केला. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सर्वांत मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही राऊतांनी केला.
संजय राऊतांची गिरीश महाजनांवर टीका
खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर मोठी टीका केली होती. ‘ऑपरेशन टायगर’ राबविल्यानंतर सहा खासदार फुटले, त्याचा तीव्र संताप दिसून आला. संजय राऊत यांनी बंडखोरांना तुडवण्याची भाषा केली. त्यावर महाजनांनी बोच-या शब्दांत टीका केली. उबाठाकडे राडा करायला कोणीच उरलं नसल्याचा टोला महाजनांनी लागवला होता. तुम्ही आमच्यासोबत होता, पण ते दिवस आता राहिले नाहीत. आता तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला आहात. राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही त्यांच्या मागे फिरताय अशी टीका महाजनांनी केली होती. ठाकरे सेना संपवायला राऊत हेच पुरेसे असल्याचा टोलाही त्यांनी लगावला होता. त्यांना आमदारही वैतागले आहेत. मुंबईतील नगरसेवकही जय महाराष्ट्र करणार असल्याचा महाजनांनी दावा केला होता.
















