नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या ३ आठवड्यांपासून बेमुदत उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नीने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. वांगचुक यांची ढासळती प्रकृती पाहता त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय योग्य होता, असे उच्च न्यायालयाने म्हटले.
उपचारांबद्दलचे सगळे वैद्यकीय निर्णय डॉक्टरांचे पथक सोनम वांगचुक यांच्या सहमतीने घेतील, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सफदरजंग रुग्णालयात वांगचुक यांच्यावर उपचार सुरू राहतील आणि एम्सचे डॉक्टरदेखील त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी केंद्र सरकार, दिल्ली पोलिस आणि रुग्णालय यांच्याकडून उच्च न्यायालयाने ३ दिवसांत अहवाल मागवला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २४ जुलैला होणार आहे.
शरीराची वैद्यकीय स्थिती प्रत्येक वेळी सारखी नसते. त्यामुळे अशा प्रकरणांत न्यायालयाला संपूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवावे लागते. वांगचुक यांची प्रकृती बिघडल्याने सरकारने त्यांना रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय गरज पाहता हा निर्णय योग्य होता, असे न्यायालयाने म्हटले. सोनम वांगचुक कोणत्याही प्रकारच्या अटकेत नाहीत. त्यांच्या कुटुंबियांना रुग्णालयात जाऊन भेटण्याची परवानगी आहे. उपचारा दरम्यान पुढे घेतले जाणारे वैद्यकीय निर्णय डॉक्टरांच्या सहमतीने घेतले जातील, ही बाब न्यायालयाने स्पष्ट केली.
पत्नीची मागणी केली अमान्य
सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सिब्बल यांनी केली. वांगचुक यांना त्यांच्या डॉक्टरांना आणि वकिलांना पूर्णपणे भेटायला मिळत नाही. रुग्णाला त्याच्या गरजेनुसार पसंतीच्या रुग्णालयात उपचार घेण्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला.
















