Homeमहाराष्ट्रभेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत जाहीर

भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत जाहीर

‘राजा’ कायम, पण देशाची संरक्षण स्थिती तणावात

बुलडाणा : प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील बळीराजाचे लक्ष लागून असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत आज सकाळी ( २० एप्रिल) सूर्योदयाच्या वेळी जाहीर करण्यात आले. ३७० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या या घटमांडणीनुसार, यंदा देशाचा ‘राजा’ कायम राहिल परंतु देशाची संरक्षण स्थिती तणावात राहण्याची भविष्यवाणी करण्यात आली.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी करण्यात आलेल्या घटमांडणीचे निरीक्षण आज सकाळी करण्यात आले. यानुसार देशाचा ‘राजा’ (सत्ता) कायम असेल, म्हणजेच सत्ताधारी बदलाचे संकेत दिसत नाहीत. देशाची संरक्षण स्थिती तणावपूर्ण असेल, सीमांवरील हालचाली वाढण्याची शक्यता आहे. देशाची आर्थिक स्थिती फारशी मजबूत राहणार नाही, महागाई किंवा आर्थिक मंदीचे सावट राहू शकते.

अमरावती-बुलडाणा सीमेवर असलेल्या भेंडवळ येथे महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ३५०-३७० वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू केली होती. आजही त्यांचे वंशज ही परंपरा पुढे चालवत आहेत. शेतात मध्यभागी खड्डा खोदून त्यात मातीचा घट मांडला जातो. त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि विविध खाद्यपदार्थ (पापड, वडा, भजा) ठेवले जातात. घटाच्या भोवती १८ प्रकारची धान्ये मांडली जातात. सकाळी या घटात आणि धान्यात होणा-या बदलांवरून वर्षभराचे भाकीत वर्तवले जाते. विज्ञानाच्या युगात या घटमांडणीला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून सांगितले जाते. मात्र, तरीही गेल्या साडेतीनशे वर्षांपासून शेतक-यांचा यावर गाढा विश्वास आहे.

पाऊस आणि महापुराचा धोका
शेतक-यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हवामान अंदाजाबाबत भेंडवळच्या भाकितात म्हटले आहे की, पावसाची सुरुवात जोमदार असेल, जूनमध्ये भरपूर पाऊस होईल. जुलैमध्ये पावसाचे प्रमाण सर्वसाधारण राहील. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहून ओढ देण्याची शक्यता आहे. तर अनेक भागात अतिवृष्टीमुळे महापुराचे संकट ओढवेल, ज्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते.

कापूस-तांदूळ जोमात, पण रोगराईची भीती
यंदा पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज आहे. कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरीचे उत्पादन भरपूर येईल. ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा ही पिके सर्वसाधारण राहतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR