अपघाताने शिवसेनेत : शिंदे, शंभूराज देसाईंवर निशाणा
सातारा : प्रतिनिधी
मी आणि माझ्या कुटुंबाने भाजपसाठी काम केले आहे. २०१९ साली कोरेगावची जागा शिवसेनेला गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला उद्धव ठाकरेंकडे पाठवले आणि अपघाताने आपण शिवसेनेत गेलो, असे वक्तव्य आमदार महेश शिंदे यांनी केले. जिल्ह्यात शिवसैनिक राहिला आहे का असा सवाल करत आपण स्वत:च्या जीवावर निवडून आल्याचा दावाही महेश शिंदे यांनी केला.
साता-यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रियेत कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी शिवसेनेच्या भूमिकेला साथ दिली नाही. त्यावेळीपासूनच सातारा शिवसेना आमदारांत धुसफूस सुरू झाली. कारण शिंदे सेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी शिवसेनेऐवजी भाजपला साथ दिली आणि त्यांच्या पत्नीच जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या. त्यानंतर आता आमदार महेश शिंदे यांनी आज प्रथमच जाहीर प्रतिक्रिया देत शिवसेना आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौ-यातील कार्यक्रमाला आपल्याला बोलावलेच नाही, असा दावा महेश शिंदे यांनी केला. तसेच जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे, असा सवाल करत स्थानिक नेतृत्वालाही टोला लगावला.
मी मूळचा भाजपचा,
महेश शिंदेंचे वक्तव्य
महेश शिंदे म्हणाले की, माझी पत्नी शिवसेनेतून निवडून आली आणि भाजपमधून अध्यक्ष झाली असे घडले नाही. माझी पत्नी पहिल्यापासून भाजपचे काम करते. अख्खे कुटुंब भाजपचे काम करते. २०११ साली साता-यात कुणीही भाजपचे काम करत नव्हते. तेव्हापासून मी काम करत होतो. २०१९ मध्ये ही जागा शिवसेनेकडे गेल्याने अपघाताने मी शिवसेनेत गेलो आणि स्वत:च्या जीवावर निवडून आलो, असे शिंदे म्हणाले.
छ. संभाजीनगरमध्येही
उपमहापौरांविरुद्ध संताप
छत्रपती संभाजी नगरच्या शिंदे यांच्या शिवसेनेत पुन्हा एकदा स्वीकृत नगरसेवकावरून बेबनाव पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत शिंदे सेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी शुभम काळे यांचे नाव जाहीर करण्यात आले. याविरुद्ध इच्छुक रस्त्यावर उतरले. यावरून इच्छुक विनोद बनकर यांनी उपमहापौर जंजाळ यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन केले.

