नवी दिल्ली : काश्मीरच्या पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सीआरपीएफच्या (CRPF) ताफ्यावर झालेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्याचा मुख्य कटकारस्थान रचणारा दहशतवादी अर्जुनमंत गुलझार दार उर्फ हम्झा बुर्हान (Hamza Burhan) हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) मारला गेला आहे. मुझफ्फराबाद येथील मुक्कामादरम्यान अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
महाविद्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी गाठले.
प्राप्त माहितीनुसार, पुलवामा हल्ल्यानंतर हा दहशतवादी ओळख लपवून मुझफ्फराबादमधील गोजरा भागात ‘डॉक्टर’ या टोपणनावाने एका खाजगी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून राहत होता. गुरुवारी सकाळी तो महाविद्यालयातून बाहेर पडत असतानाच, दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अतिशय जवळून गोळीबार केला.
हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात हम्झा बुर्हान याच्या डोक्यात तीन गोळ्या लागल्या. त्याला अत्यंत गंभीर अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला हेलिकॉप्टरद्वारे रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात (CMH) हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या एका संशयिताला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे समजते.
‘आयएसआय’ (ISI) कडून होते कडक सुरक्षा कवच
हम्झा बुर्हान हा पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ (ISI) च्या अत्यंत जवळचा होता. तो मुझफ्फराबादच्या बाहेरील चिला बंदी या दाट लोकवस्तीच्या भागात राहत होता. त्याला पाकिस्तान सरकार आणि आयएसआय कडून ८ कमांडो, बुलेटप्रूफ गाडी आणि एस्कॉर्ट वाहन अशी उच्चस्तरीय सुरक्षा पुरवण्यात आली होती. एवढ्या कडक सुरक्षेत असतानाही अज्ञात हल्लेखोरांनी त्याला अचूक टार्गेट केल्याने पाकिस्तानातील दहशतवादी वर्तुळात प्रचंड खळबळबळ उडाली आहे.
भारतात ‘UAPA’ अंतर्गत घोषित दहशतवादी
मूळचा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा (खर्बातपोरा) येथील रहिवासी असलेला हम्झा २०१७ मध्ये उच्च शिक्षणाच्या बहाण्याने कायदेशीर कागदपत्रांसह पाकिस्तानात गेला होता. मात्र, तेथे गेल्यावर तो ‘अल-बद्र’ या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेत सामील झाला आणि आपल्या क्रूर कृत्यांमुळे वेगाने कमांडर पदापर्यंत पोहोचला.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) तपासानुसार, २०१९ मधील पुलवामा हल्ल्यासाठी आरडीएक्स (RDX) आणि इतर स्फोटके तसेच ग्रेनेड पुरवण्यात हम्झा बुर्हानची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. त्याच्या दहशतवादी कारवायांची दखल घेत भारताच्या गृह मंत्रालयाने (MHA) २०२२ मध्ये त्याला ‘युएपीए’ (UAPA) कायद्यांतर्गत ‘घोषित दहशतवादी’ (Designated Terrorist) म्हणून घोषित केले होते. नुकत्याच झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरेही त्याच्याशी जोडले गेले होते.
पाकिस्तान बनले दहशतवाद्यांचे स्मशान
गेल्या काही महिन्यांपासून भारतात वॉन्टेड असलेल्या आणि पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या अनेक टॉप मोस्ट दहशतवाद्यांचा अशाच प्रकारे ‘अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून’ खात्मा केला जात आहे. हम्झा बुर्हानच्या मृत्यूमुळे भारताला अत्यंत वेदना देणाऱ्या पुलवामा हल्ल्याच्या आणखी एका गुन्हेगाराचा अंत झाला आहे. भारताच्या संरक्षण आणि गुप्तचर वर्तुळातून या कारवाईचे अत्यंत महत्त्व मानले जात आहे.
















