नांदेड : प्रतिनिधी
विष्णुपुरी शिवारातील गोदावरी नदीच्या किना-यावर चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या अवैध वाळू उपस्यावर ग्रामीण पोलीस पथकाने २२ जून रोजी धाड टाकली. २ क्रेन, ११ तराफे, २२ ब्रास वाळू, ५ इंजिन असा एकूण १ कोटी ५१ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी ४ जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, बेग, दिगंबर पांचाळ, राजू जेंकूट, विठ्ठल शिंदे, हनवता कदम,मधुकर आवातिरक, संजय मेकलवाड, शेख गफार इस्माईल यांच्या पथकाने दि.२२ रोजी गोपनीय माहितीनुसार विष्णुपुरी शिवारातील गोदावरी नदी पात्रालगत धाड टाकली. यावेळी पथकाने आरोपी विश्वजीत नारायण दुधमल (रा. ज्ञानेश्वरनगर,पूणार्रोड वाडी ), पांडुरंग गोविंद मोरे (रा. छत्रपती चौक), अर्जुन बालाजी बेटकर (रा. हिवरा बुद्रुक ता. पूर्णा,जि. परभणी ) विजय संभाजीराव देशमुख (रा. विष्णुपुरी ) यांच्यावर अटकेची कारवाई केली. पथकाने ८ टायर असलेल्या २ क्रेन ( १ कोटी रुपये ), १ जेसीबी ( ३० लाख रुपये ), ११ तराफे ( ५ लाख ५० हजार रुपये ), २२ ब्रास वाळू ( १ लाख १० हजार रुपये ), ५ इंजिन ( १५ लाख रुपये ) असा एकूण १ कोटी ५१ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उपरोक्त ४ आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
















