38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीयएलडीएफच्या आमदारावर गुन्हा दाखल

एलडीएफच्या आमदारावर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : देशभरात विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि डावे एकत्र लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. मात्र केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी आणि डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखालील आघाडी एकमेकांच्या आमने सामने आले होते. शुक्रवारी झालेल्या मतदानापूर्वी प्रचारामाध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रचारादरम्यान, एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोपही करण्यात आले.

यादरम्यान डाव्या पक्षांच्या एलडीएफ आघाडीमधील आमदार पी. व्ही. अन्वर यांनी काँग्रेसचे नेते आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राहुल गांधी यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यानंतर आता अन्वर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अन्वर यांचे विधान हे दोन समाजामधील तेढ वाढवणारे असल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

पी. व्ही. अन्वर यांनी २२ एप्रिल रोजी पलक्कड जिल्ह्यात एका प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख चौथ्या श्रेणीमधील नागरिक असा केला होता. तसेच राहुल गांधी यांच्या डीएनएची चाचणी केली पाहिजे, अशी मागणी केली होती. तसेच राहुल गांधी हे गांधी या आडनावाने संबोधण्याच्या पात्रतेचे नसल्याचेही विधान त्यांनी केले होते. दरम्यान, या प्रकरणी मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशानुसार शुक्रवार २६ एप्रिल रोजी एलडीएफचे आमदार पी.व्ही. अन्वर यांच्याविरोधात नट्टुकल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अन्वर यांच्यावर भादंवि कलम १५२ ए आणि लोकप्रतिनिधित्व कायदा कलम १२५ अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. वकील बैजू नोएल रोसारियो यांच्याकडून दाखल तक्रारीची दखल घेताना कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रसारादरम्यान राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी आणि अटकेपासून सवलत मिळत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अन्वर यांनी हे विधान केले होते. तसेच केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजय यांनीही अन्वर यांच्या विधानाला पाठिंबा दिला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR