35.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रजरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार

जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार

मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर भाजपाने जरांगेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जरांगे यांचे आंदोलन, त्यांनी केलेले आरोप, या आंदोलनाच्या मागे असलेल्या शक्ती या सर्व बाबींची विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमून चौकशी करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. यामुळे विधानसभेचे कामकाज एकदा तर विधान परिषदेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. विधानसभेत अध्यक्षांनी सरकारला चौकशीचे निर्देश दिले तर विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच महाराष्ट्र अशांत करण्यामागे कोण कोण आहेत, याची एसआयटी चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका करताना गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यामुळे आजपर्यंत जरांगे यांच्या बाबतीत सावध भूमिका घेणा-या सत्ताधारी मंडळींनी आक्रमक रुप धारण केले आहे. आज सत्ताधारी आमदारांनी विशेषत: भाजपा सदस्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाची व त्या माध्यमातून राज्यात हिंसाचार घडवण्याच्या प्रयत्नाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत हा विषय उपस्थित केला.

मुंबई उच्च न्यायालयाने सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, अशी टिप्पणी सोमवारी केली होती. तो दाखला देत आशिष शेलार म्हणाले, मराठा समाजाच्या भावना आणि मागण्यांबाबत सर्वांचेच एकमत आहे; पण महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा कोणी करीत असेल तर त्याची दखल घ्यावीच लागेल. प्रकाश सोळंके, जयदत्त क्षीरसागर, राजेंद्र म्हस्के यांची घरे जाळली गेली. जरांगे यांच्या आंदोलनाबद्दल आम्हाला आक्षेप नाही; पण त्या मागे कोणत्या शक्ती आहेत? कोण कोण या कटकारस्थानामध्ये होते? कुणाच्या कारखान्यावर बैठका झाल्या? याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तेव्हा एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले

सगळं बाहेर येईल : फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांच्या निर्देशाप्रमाणे चौकशी करण्यात येईल असे सांगतानाच, आपली भूमिकाही मांडली. मला या विषयावर बोलायचे नव्हते; पण बोलावे लागते आहे. मराठा आरक्षण माझ्याच कार्यकाळात दिले गेले. त्यामुळेच संपूर्ण मराठा समाज माझ्या मागे आहे; पण मला आई-बहिणीच्या शिव्या द्यायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, हा काय प्रकार आहे. कुणाचे कार्यकर्ते आहेत? कोण पैसा देते आहे? हे सारे समोर येईलच. त्यासाठी एसआयटी चौकशी करावी, असे म्हटले.

महाराष्ट्र अशांत करण्यामागे कोण ते शोधून काढू : मुख्यमंत्री
जरांगेंच्या माध्यमातून आंदोलन सुरू असताना महाराष्ट्र अशांत ठेवण्यामागे कोण कोण आहेत, याची एसआयटी चौकशी करणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली. मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वक्तव्यावरून विधान परिषदेत संतप्त पडसाद उमटले. सत्ताधा-यांनी आक्रमक भूमिका घेऊन जरांगेच्या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR