सोलापूर : सोलापूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. धावपळीच्या काळात बऱ्याच चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी झालेली असते. सोलापूर जिल्हा-सत्र न्यायालय व जिल्हा परिषद समोर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. वैतागलेले वाहनधारक सोलापूर आहे की ट्रॅफिक जामपूर असा त्रागा करत होते.
सोमवार दि. १९ जानेवारी रोजी सोलापूर जिल्हा परिषद परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होती. परिसरात असणाऱ्या टपऱ्या, अरुंद रस्ते व रस्त्यांवर कशीही लावलेली व उभी केलेली वाहने अशा अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीवर नियंत्रण करण्यासाठी कोणताही सक्षम अधिकारी नसल्यामुळे परिसरातील सर्वच रस्त्यांवरून दुचाकी व चारचाकी वाहने कशीही येत होती, कशीही दुसऱ्या बाजूला वळवली जात होती. परिणामी मानवनिर्मित वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. वारंवार असा प्रकार या भागात होत होता.
वाहतूक कोंडीत सापडलेल्या वाहनधारकांना एकमेकांवर आरडाओरडा, संताप त्रागा करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत होते. विशेषतः रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या लोकांमध्ये सर्वांना कळत होते की कोणत्या वाहनाने कशी घुसखोरी केली व आता त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी कशी सोडली पाहिजे. मात्र आपलं कोण ऐकणार? विनाकारण कुणाकडून का शिव्या खायच्या? असे बोलून कोणीही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढे येत नव्हते.
दुर्दैवाची बाब म्हणजे हा बाहेर इतका वाहतूक कोंडीचा नेहमीच असूनही या भागात वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस कर्मचारी क्वचितच दिसतात. विशेषतः आजच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती, त्या ठिकाणी कोणताही कर्मचारी दिसत नव्हता.
जिल्हा व सत्र न्यायालयासमोरही असाच प्रकार दिसून आला. वाहनांची गर्दी, त्यामानाने अरुंद रस्ता असे येथील चित्र असल्याने कोर्टासमोर वाहन रेटताना वाहन चालकांना अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागत होता. वकिलांच्या कार्यालयाबाहेर लावलेली वाहने, विविध व्यवसायिकांच्या टपऱ्यांसमोर असलेली वाहने यातून दोन्ही बाजूने अरुंद असलेला रस्ता आणखी अरुंद होतो. परिणामी या ठिकाणीही नित्याचीच वाहतूक कोंडी असते.
न्यायालय व जिल्हा परिषद या दोन ठिकाणाच्या चौकात तसेच परिसरात वाहतूक कोंडी नित्याची असते, मात्र अन्यही मोठ्या चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत असते. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नसल्याने सात रस्ता परिसरात विशेषतः धावपळीच्या काळात प्रचंड वाहतूक कोंडी असते. एसटी स्टँड परिसरात एकेरी रस्ता पद्धत जरी सुरू असली तरी त्या ठिकाणी ही वाहतूक कोंडी नेहमीचीच असते. या ठिकाणी सिंगल यंत्रणा कार्यरत नसते. पार्क परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नवी वेस पोलीस चौकी परिसर, विजापूर वेस परिसर, मधला मारुती चौक परिसर, टिळक चौक, बाळीवेस, कन्ना चौक परिसर अशा महत्त्वाच्या चौकांमध्ये नेहमीचीच वाहतूक कोंडी असते. वाहतूक कोंडीचा हा प्रश्न दिवसेंदिवस मोठा जटिल होत चालला आहे. वाहनांची संख्या वाढली हे कारण देऊन संबंधित यंत्रणांना आपली जबाबदारी ढकलता येणार नाही.
वाहतूक कोंडीची ही समस्या पाहता नव्याने महापालिकेत बसणाऱ्या नगरसेवकांना व भाजपच्या येऊ घातलेल्या सत्तेला नियमित पाणीपुरवठा, सिटी बस सेवा अशा अनेक प्रश्नांबरोबरच सोलापूर शहरवासीयांची वाहतूक कोंडीतून मुक्तता हा प्रश्न देखील प्राधान्याने आपल्या कामाच्या अजेंड्यावर घ्यावा लागणार आहे.
दिवसभर वाहतूक पोलिस नेमण्याची गरज
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातून जास्त संख्येने येत असलेले लोक, जिल्हा परिषद असल्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी जिल्हाभरातून मिळणाऱ्या लोकांची गर्दी, मुळातच अरुंद रस्ते अशी अनेक कारणे पाहता जिल्हा परिषद व न्यायालय परिसर या भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दिवसभर दोन-तीन ठिकाणी वाहतूक पोलीस नेमून त्यांच्याकडून झाली वाहतूक कोंडी कमीत कमी वेळेत मोकळी करण्याचे काम तरी करावे अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

