न्यूयॉर्क : जगप्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीची १२ जून रोजी सार्वजनिक बाजारात एन्ट्री होत आहे. १.७५ ट्रिलियन डॉलर्सच्या ऐतिहासिक मूल्यांकनासह स्पेसएक्स बाजारात उतरत असल्याने एलन मस्क जगातील पहिले ट्रिलियनियर बनण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र, या यशाच्या मागे मस्क यांच्यानंतर कंपनीतील दुसरे सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक आणि भारतीय वंशाचे अँटोनिओ ग्राशियास (५५) हे नाव सध्या वॉल स्ट्रीटवर प्रचंड चर्चेत आले आहे. या आयपीओमुळे ग्राशियास यांच्या संपत्तीत तब्बल ९० अब्ज डॉलर्सची (जवळपास ७.५ लाख कोटी रुपये) भर पडणार आहे.
शिकागो येथील वॅलोर इक्विटी पार्टनर्स या प्रायव्हेट इक्विटी फर्मचे संस्थापक आणि सीईओ असलेल्या ग्राशियास यांची मस्क यांच्याशी २००० च्या सुमारास ओळख झाली होती. २००८ मध्ये जेव्हा मस्क यांची टेस्ला कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती, तेव्हा ग्राशियास यांनी मस्क यांच्यावर विश्वास ठेवून १ मिलियन डॉलर्सचे वैयक्तिक कर्ज दिले होते. त्यानंतर त्यांनी स्पेसएक्समध्ये ७६ दशलक्ष डॉलर्सची पहिली संस्थात्मक गुंतवणूक केली. आज स्पेसएक्समध्ये त्यांचा ७.३ टक्के आर्थिक हिस्सा आहे. सध्या ५.९ अब्ज डॉलर्स मूल्य असलेली त्यांची ही गुंतवणूक आयपीओनंतर थेट ९० अब्ज डॉलर्सवर, तर कंपनीचे मूल्यांकन २ ट्रिलियन डॉलर्सवर गेल्यास १४० अब्ज डॉलर्स पार करेल.
मस्क आणि ग्राशियास यांच्यातील नाते केवळ पैशांपुरते मर्यादित नाही. २०१८ मध्ये जेव्हा टेस्लाच्या मॉडेल ३ च्या उत्पादनाचे संकट आले होते, तेव्हा ग्राशियास यांनी मस्क यांच्यासोबत फॅक्टरीच्या फ्लोअरवर २४ तास काम केले होते. अनेक रात्री त्यांनी फॅक्टरीच्या कॉन्फरन्स रूममध्ये झोपून काढल्या. मस्क यांचा ४७ वा वाढदिवसही त्यांनी फॅक्टरीमध्येच साजरा केला होता. ग्राशियास यांनी टेस्ला, स्पेसएक्स, सोलरसिटी, न्यूरालिंक आणि द बोरिंग कंपनीच्या बोर्डावर काम केले आहे.
















