परभणी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दि. १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर पराक्रम दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा व राष्ट्रनिष्ठेचा परिचय नवीन पिढीला व्हावा या उद्देशाने राज्यभर दि.१ ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
पराक्रम दिन साजरा करण्यासंदर्भात अमृत संस्थेमार्फत पराक्रम दिन समिती स्थापन करण्यात आलेली असून त्या समितीमध्ये काकासाहेब विधाते, पांडुरंग बलकवडे, जगन्नाथ लडकत, मोहन शेटे, मंगेश खाडिलकर, कौमुदी परांजपे या दिग्गज इतिहासतज्ज्ञ व अभ्यासकांचा समावेश आहे. या पराक्रम दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये व खुल्या गटातील नागरिकांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून जास्तीत जास्त नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.
पराक्रम दिन स्पर्धांचे गट व स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.
निबंध स्पर्धा : शालेय गट, महाविद्यालयीन गट व खुला गट. निबंधाची शब्दमर्यादा जास्तीत जास्त १००० शब्द असून मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत टाईप करून त्याची पीडीएफ फाईल अपलोड करावी. निबंधासाठी लागणारे संदर्भ अमृत पराक्रम दिनच्या संकेतस्थळावरील लिंक्स, संदर्भ पुस्तके व माहिती पुस्तिकेवरच आधारित असावेत. बक्षीसपात्र निबंधांबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
वक्तृत्व स्पर्धा शालेय गट, महाविद्यालयीन गट व खुला गट. स्पर्धकाने स्वभाषणातील जास्तीत जास्त ७ मिनिटांचा व्हिडिओ सादर करणे अपेक्षित आहे. व्हिडिओ स्वत:चा, ओरिजिनल, स्पष्ट व ठळक आवाजातील असावा. व्हिडिओमध्ये कोणतेही व्हिज्युअल इफेक्ट्स, साऊंड इफेक्ट्स किंवा एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) जनरेटेड इमेजेस वापरू नयेत. उत्तम गुणवत्तेचा व्हिडिओ तयार करून अमृत पराक्रम दिनच्या वेबसाईटवर अपलोड करावा. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
रिल्स स्पर्धा महाविद्यालयीन गट व खुला गट. प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी १५ ऑगस्ट असून स्पर्धांचे स्वरूप, विषय, बक्षिसे व अधिकृत नियमावली पराक्रम दिनच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व शाळा, महाविद्यालये तसेच इच्छुकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.
















