भोजपूर : बिहारमधील भोजपूर येथील भरत तिवारी एन्काउंटर प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर गोळीबार करणा-या बिहार एसटीएफ जवान अक्षय कुमारला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. भरत तिवारीचा एन्काउंटर १७ जून रोजी झाला होता. त्याची आई आशा देवी यांनी अक्षय कुमारवर हत्येचा आरोप केला होता. पोलिसांनी आरोपी जवानाला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.
आत्मसमर्पण केल्यानंतर भरत तिवारीला पहिली गोळी अक्षय कुमारने मारली होती, असा आरोप आहे. यानंतर घटनास्थळी त्याला आणखी चार गोळया मारण्यात आल्या. एन्काउंटरच्या चौकशीदरम्यान अक्षय कुमारला अनेकदा बोलावूनही तो चौकशीसाठी आला नाही. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि पाळत ठेवून त्याला पकडले आहे.भरत एन्काउंटरमधील पहिल्या अटकेवर आशा देवी म्हणाल्या, ‘मला आनंद आहे की पोलिसांनी कारवाई केली आहे. पुढेही कारवाई व्हायला हवी. एसडीएम, डीएसपी यांनाही अटक व्हायला हवी, भरतने त्यांची नावे घेतली होती.
दरोगाही यात सामील होता. त्यालाही अटक करायला हवी. मुख्यमंर्त्यांनी न्याय मिळवून देण्याबद्दल सांगितले आहे, मला त्यांच्यावर विश्वास आहे. भरत तिवारी यांचे वडील काशीनाथ तिवारी म्हणाले, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी जे सांगितले होते ते खरे होताना दिसत आहे. ज्याला अटक झाली आहे, त्यानेच पहिली गोळी झाडली होती. आता तोच सर्व रहस्ये उघड करेल. आता एसडीएम, मग एसडीपीओ यांना अटक होईल. याच प्रकारे इतर लोकांनाही अटक होईल. मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की कोणालाही सोडणार नाही. त्यांनी जे सांगितले होते ते वचन पाळत आहेत.
















