क्वेटा : पाकिस्तानच्या बलूचिस्तानमध्ये एक भीषण दुर्घटना घडली असून येथील कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात २० मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर २४ अन्य मजूर ढिगाखाली अडकल्यÞाची भीती व्यक्त करण्यात आली आहेत. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, अडकलेले कामगारांची गंभीर परिस्थिती असून त्यांचे युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथील कोळसा खाणीत मिथेन वायू साचल्यामुळे झालेल्या भीषण स्फोटात २० मजूरांचा मृत्यू झाला असून २४ इतर मजूर खाणीच्या ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सरकारी खाण निरीक्षक घनी बलोच यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर तातडीने सुरू केलेल्या बचावकार्यात सुरुवातीला ९ आणि नंतर आणखी ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. खाणीमध्ये मिथेन वायूच्या स्फोटानंतर ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळे अडकलेले मजूर जिवंत असण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत सर्व अडकलेल्या मजूरांचा शोध लागत नाही, तोपर्यंत बचावकार्य युद्धपातळीवर सुरूच राहणार असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बलुचिस्तानचे खाण आणि खनिज विकास मंत्री, शोएब नोशेरवानी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख पाकिस्तानी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. तसेच, कठीण परिस्थितीत बचावकार्य सुरू असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून भविष्यात असे अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपायांचा आढावा घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पाकिस्तान सेंट्रल माइन्स लेबर फेडरेशनसह विविध कामगार संघटनांनी हा अपघात प्रशासकीय आणि मालकांच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप करत सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अधिकारी सध्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देत आहेत.
















