नांदेड : प्रतिनिधी
देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेतील २० हून अधिक विद्यार्थ्यांना मांसाहारी भोजनातून विषबाधा झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. रविवारी ९ ऑगस्ट रोजी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जेवणामध्ये चिकन देण्यात आले होते. हे भोजन केल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी अनेक विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, पोटदुखी तसेच अस्वस्थतेचा त्रास सुरू झाल्याने शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना तातडीने देगलूर येथील रुग्णालयात दाखल केले.
विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने काही काळ आश्रमशाळा परिसरातही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, विद्यार्थ्यांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवार असल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणात चिकनचा समावेश करण्यात आला होता. जेवण केल्यानंतर तत्काळ कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत. मात्र, १० ऑगस्ट रोजी सकाळपासून विद्यार्थ्यांना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला.
एकापाठोपाठ अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने शाळा प्रशासनाची धावपळ उडाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना देगलूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. दरम्यान, एकाच भोजनानंतर जास्त विद्यार्थ्यांना त्रास झाल्याने भोजनातूनच विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागानेही याची दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत.
















