मुंबई : पत्नीला तिच्या स्वयंपाकावरून टोमणे मारणे हे भारतीय दंड विधान (आयपीसी) कलम ४९८ अ अंतर्गत क्रूरता ठरत नाही, असे निरीक्षण नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच या प्रकरणी पतीच्या नातेवाईकांविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा
रद्द करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. १३ जुलै २०२० रोजी लग्न झाले. विवाहितेला सासरच्या मंडळींनी नोव्हेंबर २०२० मध्ये घरातून बाहेर काढले होते. त्यानंतर तिने ९ जानेवारी २०२१ रोजी फिर्याद दिली होती. तिने फिर्यादीत म्हटले होते की, पती तिच्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करू शकला नाही. पतीचे भाऊ तिला स्वयंपाक करायला येत नाही.
तुम्हाला आई-वडिलांनी काहीच शिकवलं नाही, असे टोमणे मारत सातत्याने टिंगल-टवाळी करतात, असा आरोप पत्नीने तक्रारीत केला होता. या प्रकरणी पतीच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पत्नीने दिलेल्या फिर्यादीनंतर पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध आयपीसीच्या कलम ४९८ अ नुसार गुन्हा दाखल झाला होता. या कारवाईविरोधात नातेवाईकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई आणि न्यायमूर्ती एनआर बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
नातेवाईकांविरुद्धचा गुन्हा रद्द करण्याचा आदेश खंडपीठाने दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर स्पष्ट केले की, ‘‘या प्रकरणात या याचिकाकर्त्यांवर एकच आरोप करण्यात आला आहे की त्यांनी टिप्पणी केली होती की, महिलेला स्वयंपाक कसा करावा हे माहीत नाही, अशा टिप्पण्यांना आयपीसी कलम ४९८ अ अंतर्गत ‘क्रूरता’ समजत नाही. या कलमान्वये किरकोळ मारामारी ही क्रूरता मानली जात नाही. कलम ४९८अ अन्वये गुन्हा सिद्ध करण्यासाठी, स्त्रीवर सतत क्रूरता केली जात होती हे सिद्ध करावे लागेल, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांविरोधातील एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले.