नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून काँग्रेसने भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेस नेते प्रियांक खरगे यांनी सोशल मीडियावरील ‘एक्स’वरील पोस्टद्वारे भाजप, आरएसएस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
प्रियांक खरगे म्हणाले की, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय प्रवास मोठ्या प्रमाणात राम मंदिर आंदोलनाभोवती उभा राहिला आहे. १९९० च्या दशकापासून राम मंदिर हा आरएसएसचा सर्वात महत्त्वाचा राजकीय मुद्दा राहिला असून त्याच मुद्द्यावर भाजपने आपले राजकारण उभे केले असा आरोप त्यांनी केला. राम मंदिरातील देणगीशी संबंधित कथित गैरव्यवहाराचे सत्य बाहेर येऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला. या प्रकरणात जनतेने विचारलेल्या प्रश्नांवर मर्यादा आणण्याचा प्रयत्न होत असल्याने संबंधितांकडून स्पष्ट भूमिका घेणे टाळले जात असल्याचे ते म्हणाले.
भाजप आणि आरएसएस यांनी आता इतकी मोठी राजकीय ताकद मिळवली आहे की, या प्रकरणावर कोणी प्रश्न उपस्थित करू नयेत, अशी त्यांची अपेक्षा असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणे आणि त्याची उत्तरे मागणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रामाच्या नावाचा वापर करून भाजप आणि आरएसएस यांनी राजकीयच नव्हे, तर आर्थिक फायदाही करून घेतल्याचा आरोप करत, कथित देणगी गैरव्यवहारातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न झाला तर सत्तेला आणि राजकीय हितसंबंधांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचा संदेश जनतेमध्ये जाईल, असे प्रियांक खरगे यांनी म्हटले.
















