किनवट (प्रतिनिधी) : किनवट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, याच पावसामुळे एका ३२ वर्षीय ग्रामपंचायत सेवकाला आपला जीव गमवावा लागल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कंचली येथील ग्रामपंचायत सेवक राजू रेड्डी दांडेलु यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला असून, सुमारे २४ तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर गुरुवारी त्यांचा मृतदेह हाती लागला आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास राजू दांडेलु हे कंचली गावातून रेवा नायक तांड्याकडे जात होते. दरम्यान, कंचली-आंदबोरी मार्गावरील एका सखल पुलावरून पाण्याचा अत्यंत वेगवान प्रवाह सुरू होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते प्रवाहाच्या तडाख्यात आले आणि पुराच्या पाण्यात वाहून गेले.
घटना समजताच इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. गुरुवारी तहसीलदार शारदा चोंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाची टीम देखील या शोधकार्यात सक्रियपणे सहभागी झाली. सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्याचा प्रचंड वेग यामुळे शोधकार्यात अनेक मोठे अडथळे निर्माण झाले होते; परंतु प्रशासनाने आणि ग्रामस्थांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. अखेर २४ तासांच्या सततच्या प्रयत्नांनंतर राजू दांडेलु यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. या घटनेमुळे कंचली व परिसरात शोककळा पसरली आहे.
किनवट तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, आंदबोरी, पांगरपहाड, रेवा नायक तांडा आणि अप्पारावपेठ या गावांचा तालुका मुख्यालयाशी असलेला रस्ते संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, पुराच्या पाण्यातून किंवा ओहोळा-नाल्यांच्या वेगात कोणीही प्रवास करू नये आणि काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
















