नवी दिल्ली : सध्या एका कोंबड्याला पोलीस संरक्षण देण्याचे प्रकरण चर्चेत आले आहे. एक कोंबड्याला पोलिसांची सुरक्षा मिळाली आहे. पोलीस त्यांची देखभाल करत आहेत. तसेच न्यायालयात त्याला साक्षीदार म्हणून हजर करावे लागणार आहे.
पंजाबमधील बठिंडामधील या प्रकरणाची चर्चा सर्वत्र होत आहे. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंबड्यांची लढाई लावण्याचा खेळासंदर्भातील हा प्रकार आहे. या लढाईत कोंबडा जखमी झाला आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
लढाईच्या स्पर्धेत कोंबडा जखमी
बठिंडामधील बल्लुआना गावात कोंबड्याच्या लढाईची स्पर्धा आयोजित केली होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर पोलीस स्पर्धेच्या ठिकाणी दाखल झाले. या स्पर्धेत जवळपास २०० जण सहभागी झाले होते. पोलीस घटनास्थळी पोहचताच सर्व जण फरार झाले. पोलिसांनी त्या ठिकाणी दोन कोंबडे आणि एक व्यक्ती मिळाला. कोंबड्याच्या लढाईच्या स्पर्धेत त्याचा छळ केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे घटनास्थळी कोंबडा जखमी अवस्थेत सापडला.
पोलिसांनी दिली सुरक्षा
घटनास्थळी जखमी झालेल्या कोंबड्याला पोलिसांच्या सुरक्षेत ठेवण्यात आले आहे. त्याचा आहार आणि आरोग्याची काळजी पोलीस घेत आहे. पोलीस एक पुरावा आणि साक्षीदार म्हणून कोंबड्याला न्यायालयात सादर करणार आहे. पोलीस अधिकारी निर्मल सिंह यांनी सांगितले की, पोलिसांचे निर्देश मिळाल्यानंतर कोंबड्याला न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. यामुळे त्याला पोलिसांच्या सुरक्षेत ठेवण्यात आले आहे. घटनास्थळावर अनेक ट्रॉफी जप्त करण्यात आल्या आहेत.