मुंबई : काही दिवसांपूर्वी मालाड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याची एक वादग्रस्त घटना घडली होती. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर, मालाड येथील जैन समाजाच्या मुख्य पदाधिका-यांनी आणि शिष्टमंडळाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. घडलेल्या प्रकाराबाबत जैन समाजाच्या वतीने लेखी माफीनामा सुपूर्द करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मान राखत, आपल्या खास शैलीत जैन समाजाच्या प्रतिनिधींना समज दिली. मुंबईत सध्या ठिकठिकाणी दुकानांच्या पाटया किंवा मराठी फलकांवर पांढरे पट्टे मारण्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे जैन आणि मराठी समाजात विनाकारण वाद निर्माण होत आहेत. हे वाद तातडीने थांबले पाहिजे आणि मराठी अस्मितेचा आदर राखला गेलाच पाहिजे…, अशा कडक शब्दांत राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला सुनावले आहे.
जैन समाजाची मनापासून दिलगिरी
जैन समाजाच्या प्रतिनिधींनी घडलेल्या घटनेबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली असून, कोणत्याही समाजाच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचा आमचा हेतू नव्हता, असं स्पष्ट केलंय. तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत आणि सामाजिक सलोखा राखला जाईल, अशी ग्वाही त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली आहे.
















