पुणे : दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दगडावरील पायाचे ठसे आधार कार्डशी लिंक करून ओळख पटवली जाईल असा अजब दावा करणारे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आता राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होत आहे.
रवींद्र धंगेकर यांनी एक्सच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांची जोरदार खिल्ली उडवली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, वाय झेड सिक्युरिटी असलेल्या माणसाची बुद्धिमत्ता वाय झेड झाल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे चंद्रकांतदादा..! अतिशय बुद्धिमान वैज्ञानिकांना सुद्धा प्रश्न पडावा अशी तल्लख बुद्धी चंद्रकांतदादांना लाभली आहे. आमच्या पुणेकरांचे भाग्य आहे की असा आमदार आम्हाला लाभला आहे आणि त्याहून मोठे भाग्य आपल्या राज्याचे आहे की अशी व्यक्ती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहे. माझी विनंती आहे चंद्रकांतदादांनी दगडावरचे फिंगरप्रिंट आधार कार्डला लिंक करून दाखवावे, नाहीतर दादांचा सुद्धा राजीनामा घ्यायला काही हरकत नाही. आपल्या मुलांच्या भवितव्यापेक्षा जास्त महत्त्वाचे काहीच नाही.
भोंदू खरातच्या दर्शनानंतर दादांची बुद्धी भ्रष्ट
माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांवर आणखी कठोर शब्दांत निशाणा साधला. हे कोल्हापूरचे पार्सल आहे. पुढच्या वेळेस ते पुण्यात राहतील की नाही माहिती नाही, पण ते पुण्याची वाट लावून जाणार आहेत. ते अतिशय कपटी आणि दुष्ट आहेत. लिंगपिसाट आणि भोंदू असलेल्या अशोक खरातचे दर्शन घेतल्यापासून चंद्रकांतदादांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे अशी खोचक टीकाही धंगेकरांनी केली.
पाटील यांचे ऑफिस तपासावे
चंद्रकांत पाटलांच्या फिंगरप्रिंटच्या दाव्याचा समाचार घेताना धंगेकर म्हणाले, पुणे पोलिसांनी चंद्रकांत पाटील यांचे ऑफिस तपासावे, तिथे कुख्यात गुंड निलेश घायवळचे फिंगरप्रिंट मिळतील. विद्यार्थ्यांचे आंदोलन आता शांत झाले आहे. अशा वेळी पुन्हा अशी विधाने करून विषय चिघळवणे योग्य नाही. पक्षापेक्षाही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि जनतेशी आत्मीयता असणे गरजेचे असते असेही त्यांनी सुनावले.
देश मोठ्या संशोधकाला मुकेल : संजय राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. चंद्रकांतदादांनी दगडावरचे ठसे आधारला लिंक करण्याचे अनोखे संशोधन केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली पाहिजे आणि त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू केले पाहिजे. त्यांना हा पुरस्कार दिला नाही, तर देश एका मोठ्या संशोधकाला मुकेल असा टोला राऊतांनी लगावला. तसेच दादांचा दगडाशी फार जुना आणि जवळचा संबंध असल्याचा चिमटाही त्यांनी काढला.
चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले होते?
सांगली येथील पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली पोलिस आणि एका पत्रकाराच्या युट्यूब व्हीडीओचा हवाला देत एक दावा केला होता. जंतरमंतरवर आंदोलन करणा-या तरुणांच्या पायाचे आणि हाताचे ठसे तिथे पडलेल्या दगडांवर उमटले आहेत. ते ठसे आता आधार कार्डशी लिंक करून या विद्यार्थ्यांची आणि आंदोलकांची ओळख पटवली जाणार आहे असा दिल्ली पोलिसांचा अॅडव्हान्स तपास आहे असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या याच विधानावरून आता राजकीय वातावरण तापले असून त्यांच्यावर सर्व थरांमधून टीकेची झोड उठली आहे.
















