नवी दिल्ली : जर संघातून दुसरा आवाज निघत असेल तर याचा अर्थ मोदी शहांनी माणसे पेरलेली आहेत, अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच इन्स्टाग्राम आणि एक्सवरच संसद चालवायची होती मग मोदींनी २० हजार कोटी रुपये खर्च करून नवीन संसद कशासाठी उभी केली? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सगळ्यांनी ठरवून आता एक जाहिरात द्यायची. गुमशुदा की तलाश. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवले आहेत. दोन आठवडे झाले, संसदेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे खासदारांना दर्शन झालेले नाही. मग संसद कशाकरता चालवत आहात? इन्स्टाग्रामवर, एक्सवरच संसद चालवा मग. नरेंद्र मोदींनी २० हजार कोटी रुपये खर्च करून नवीन संसद कशासाठी उभी केली? याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. जर तुम्ही संसदेत यायला घाबरत असाल मग नवीन संसद बांधलीच कशाला? मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले अशी पाटी लावायची होती म्हणून नवीन संसद बांधली का? जे पंतप्रधान देशाच्या संसदेत यायला घाबरतात त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी राहण्याचा नैतिक अधिकार आहे का? जे गृहमंत्री मोठ्या मोठ्या मोठ्या बाता मारतात, ईडी, सीबीआयच्या धमक्या देतात.
ते संसदेच्या सभागृहात यायला घाबरतात. त्यांना देशाच्या गृहमंत्रीपदी राहण्याचा अधिकार खरोखर आहे का? याचे आत्मचिंतन हे भाजपच्या खासदारांनी आणि पुढा-यांनी करायला हवे. आज आम्ही पुन्हा त्यांना बोलावण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचा राजीनामा मागण्याचा उपक्रम सुरुच ठेवू. हे महाशय परवा पुण्यात होते. रात्रीच्या काळोख्यात ते पुण्यात आले तिथे त्यांच्याविरोधात निदर्शने झाली. आज दिल्लीतही त्यांच्याविरोधात निदर्शने सुरू आहेत. अमित शहांनी जनतेला सामोरे गेले पाहिजे. तुम्हाला जर खरोखर जनतेने निवडून दिले असेल तर तुम्ही लोकांसमोर जायला पाहिजे. आणि जर तुम्ही चो-या मा-या करून, मत चोरी करून, दहशतीच्या मार्गाने निवडून आले असाल तर ती दहशत तुम्हाला छळत आहे असे संजय राऊत म्हणाले. कोणतेही आंदोलन हे घटनाविरोधी असू शकत नाहीत.
मानसिकता समजा
मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो इतिहास आहे, त्यांची जी विचारधारा आहे, ते भारतीय संविधानाला मानत नाहीत, ते भारतीय तिरंग्याला मानत नाहीत. ते भारताच्या स्वातंत्र्याला मानत नाहीत. ५२ वर्ष त्यांनी आपल्या कार्यालयात तिरंगा फडकावला नव्हता. संघाला स्वतंत्र संविधान निर्माण करायचे आहे, हे सगळ्यांना माहित आहे. म्हणून त्यांना ८५० खासदारांचे बळ निर्माण करून भारताचे संविधानच संपवायचे आहे. म्हणून हे आंदोलन संविधान विरोधी आहे असे म्हणणे हे बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान आहे.
मग भाजपने केलेली आंदोलने संविधानाच्या कुठल्या चौकटीत होती? १९७५ चे जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन हे संविधानाच्या कोणत्या चौकटीत होते? हे संघाचे महनीय पुढारी आहेत, त्यांनी हे देशाला सांगायला पाहिजे. भाजपचे सर्व लोक देश चालवताना संविधानाचा आदरच करायला तयार नाहीत. या देशातला तरुण जंतरमंतरवर जमला आणि एका भ्रष्ट शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागितला. ज्यांच्यामुळे २० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्याचा राजीनामा मागणे जर कुणाला घटनाबा वाटत असेल तर त्या माणसाची मानसिकता तपासावी लागेल असे संजय राऊत म्हणाले.
















