नांदेड : मृग नक्षत्राच्या मुहूर्तापूर्वीच नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात वरुणराजाने दमदार हजेरी लावत पावसाचा तडका दिला आहे. पावसाच्या या पहिल्या सरींसोबतच रविवारी मृगाच्या मुहूर्तावर नांदेड शहरातील प्रमुख मासे बाजारांमध्ये ग्राहकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. यंदा मृग नक्षत्र रविवार ७ जून रोजी आले असून, याच्या दोन दिवसांपूर्वीच पावसाचे आगमन झाले आहे. ग्रामीण व शहरी भागात मृग नक्षत्राला मासे खाण्याची जुनी परंपरा असल्याने, शहरातील तरोडा नाका, नाईक चौक, सिडको आणि इतवारा या प्रमुख मासे बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी झुंबड उडाली होती.
या बाजारपेठेत प्रामुख्याने मरळ, कतला आणि पापलेटसारख्या माशांना ग्राहकांकडून मोठी मागणी राहिली. मृग नक्षत्राचा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांनी रविवारी सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी केल्यामुळे व्यापारी वर्गात कमालीचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आज एकाच दिवसात नांदेडच्या मासे बाजारपेठेत लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पावसाच्या सुरुवातीलाच झालेली ही मोठी उलाढाल व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे.
मृग नक्षत्रात मासे खाण्याला केवळ परंपरेचेच नव्हे, तर आरोग्याचेही मोठे अधिष्ठान लाभले आहे. या संदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांकडून मासे खाण्याचे अनेक शारीरिक फायदे सांगितले जातात. पावसाळ्याच्या सुरुवातीला बदलत्या हवामानामुळे मानवी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता असते, अशा वेळी माशांचे सेवन शरीरासाठी अत्यंत गुणकारी ठरते. माशांमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-३ आणि फॅटी ॲसिड असते, जे हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यास आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत राखण्यास मोठी मदत करते. याच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या कारणांमुळे परंपरेसोबतच आरोग्याची काळजी घेण्यासाठी नागरिकांनी मासे खरेदीला पसंती दिली आहे.
















