34.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रविशाल पाटलांचे बंड कायम

विशाल पाटलांचे बंड कायम

डॉ. राजेंद्र भस्मे 

कोल्हापूर : सांगली लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाची उमेदवारी घोषित करण्यात आल्यानंतर काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. त्यांनी अखेर बंडाचा पवित्रा कायम ठेवत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील उमेदवारी अर्ज माघार घेणार का? याबाबत सांगलीच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती. मात्र, विशाल पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारी माघारी घेतलेली नाही. त्यामुळे सांगलीची लढत तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात भाजपचे खासदार संजय काका पाटील आहेत, तर विशाल पाटील अपक्ष रिंगणात असणार आहेत. त्यामुळे सांगलीसाठी तिरंगी लढत मानली जात असली तरी तब्बल २१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे प्रत्येक बूथवर दोन ईव्हीएम असणार आहेत. विशाल पाटील यांना ‘लिफाफा’ हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे लिफाफा, कमळ आणि हाताचा पंजा त्यांच्यात खरी लढत होणार आहे.

२५ एप्रिल रोजी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा आता जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व करणा-या विश्वजीत कदम यांनाच आता विशाल पाटील यांच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे. विश्वजीत कदम यांनी २५ एप्रिल रोजी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता ज्या विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी गल्ली ते दिल्ली प्रतिष्ठा पणाला लावली होती तेच विशाल पाटील यांच्या विरोधात प्रचार करताना दिसणार आहेत.

सांगली लोकसभेसाठी कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी एकसंध असल्याचे दाखवण्यासाठी काँग्रेसकडून प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या प्रचार सभेसाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेसकडून रॅली आयोजित करण्यात आल्याने विशाल पाटील यांच्यासमोर आता आव्हान उभे ठाकले आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विशाल पाटील यांची मनधरणी
विशाल पाटील यांना काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी सांगून सुद्धा कोणताही फरक झालेला नाही. काँग्रेस नेत्यांकडून सातत्याने विशाल पाटील यांची मनधरणी सुरू होती. कोणत्याही परिस्थितीत सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी करू नये, यासाठी काँग्रेस नेत्यांकडून आमदार विश्वजीत कदम यांच्यामार्फत मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. मात्र विशाल पाटील यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, हे त्यांच्या माघार न घेण्यावरून स्पष्ट झाले आहे. दिल्लीमधील काँग्रेस हायकमांडकडून सुद्धा काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्यामार्फत विशाल पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. विधान परिषदेची ऑफरही देण्यात आली. मात्र, यामध्ये यश आलेले नाही. विशाल पाटील यांनी पक्षशिस्त मोडल्याबद्दल कारवाईचे संकेत देण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्यावर कारवाई होणार की नाही? याकडे सुद्धा लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR