नवी दिल्ली : अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रणौत पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आजच्या तरुणाईतील जेन-झी पीढिला ‘जनरेशन गटार’ म्हटल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून, आता योगगुरू बाबा रामदेव यांनीही कंगना यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. देशातील तरुणांना गटार म्हणणे हे बिघडलेल्या डोक्याचे लक्षण आहे अशा अत्यंत कडक शब्दांत रामदेव बाबा यांनी कंगना यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
एका मुलाखतीदरम्यान बाबा रामदेव यांना कंगना रणौत यांच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर संताप व्यक्त करत रामदेव बाबा म्हणाले, तिचे बालपण कसे होते? तिचे तारुण्य कसे गेले? आणि तिचे जुने पराक्रम (कारनामे) कसे राहिले आहेत? मला अशा लोकांबद्दल जास्त बोलायचे नाही. पण देशातील तरुणाईला गटार म्हणणे हे साफ चुकीचे असून ते मानसिक बिघाडाचे लक्षण आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि तिच्या पक्षातील लोकांनी या वक्तव्याची त्वरित दखल घ्यायला हवी. मुलाखतीत पत्रकाराने ‘कंगना तुमची अनुयायी असून स्वत:ला सनातनी मानते’ अशी आठवण करून दिली. यावर थेट उत्तर देताना रामदेव बाबा म्हणाले, कोणी माझ्या योगाचे कौतुक करत असेल, म्हणून मी त्यांच्या चुका किंवा पापे झाकून ठेवू का?
तरुणाई हीच देशाची खरी ताकद
तरुणाईचे समर्थन करताना बाबा रामदेव पुढे म्हणाले, आजचा तरुण कोणत्याही एका जातीचा किंवा धर्माचा नाही. मग ते ब्राम्हण असोत, क्षत्रिय, वैश्य, दलित, आदिवासी किंवा मागासवर्गीय हे सर्व आपल्याच देशाची मुले आहेत. आजच्या तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि ताकद आहे, ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. तरुणांनी चांगल्या-वाईट अनेक गोष्टींना हादरवून सोडले आहे.
















