सोलापूर : मनविसेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मनसेचे नेते अमित ठाकरे हे रविवारी ४ जानेवारी रोजी सोलापुरात आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या रणधुमाळीतून बाहेर येऊन सोलापूरला यावे आणि आपले राज्य कोठे नेऊन ठेवले आहे हे पहावे असे खडे बोल सुनावले.
रविवारी सोलापुरात आल्यानंतर अमित ठाकरे सरळ बाळासाहेब सरवदे यांच्या घरी गेले. तेथे त्यांनी शोकाकुल सरवदे कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासमोर सरवदे कुटुंबीयांनी आपल्या व्यथा सांगितल्या. या दरम्यान उपस्थितांमधून मोठ्या प्रमाणात दु:खावेग व्यक्त करण्यात आला. त्यांचे सांत्वन केल्यानंतर ठाकरे यांनी काही काळ पत्रकारांसमोर भावना मांडल्या.
बाळासाहेब सरवदे यांच्या खूनप्रकरणी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांनी मला फक्त दहा मिनिटेच द्यावीत. सोलापुरात पोलिस आयुक्तांना वैगेरे कोणालाही भेटणार नाही. सोलापुरातील सर्व परिस्थिती मला फडणवीस यांच्यासमोर मांडायची आहे. सरवदे यांच्या
आई, बायको आणि दोन मुली आज सरवदे यांच्या अस्थिचे विसर्जन करून आलेल्या आहेत. कशासाठी निवडणुकीसाठी. असे राज्य भाजपला अपेक्षित होते का? ह्याची उत्तरे मला मिळालीच पाहिजेत. बाळासाहेब सरवदेंना न्याय मिळालाच पाहिजे, असा उद्वेग त्यांनी बोलून दाखवला.
अर्ज मागे घेतो,खून करू नका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरात येऊन सरवदे कुटुंबीयांना भेटले पाहिजे. लोकांचे खून पाडून निवडणुका जिंकणार असाल तर निवडणुकाच नको. आम्ही सर्व उमेदवारी अर्ज परत घेतो, तुम्हीच जिंका. पण बिनविरोध साठी लोकांचे खून पाडू नका अशी कळकळीची विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
सोलापूरच्या मतदारांनीही विचार करण्याची वेळ
एखाद्याच्या मृत्यूवर मी कधीही राजकारण करत नाही. आजही ते करायला आलो नाही. पण तुम्ही हे राज्य कोठे नेऊन ठेवलं हे कधीतरी जाणून घेणार आहेत का नाही? आपल्या सर्वांमधील माणूस जागा झाला पाहिजे आणि सोलापुरातील घटनेचा विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा ठाकरेंनी व्यक्त केली.
सरवदे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार
बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांशी सांत्वन करताना काय चर्चा झाली, हे मी सांगणार नाही. पण सरवदे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याचे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

