32.5 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeसोलापूर‘वंचित’, ‘एमआयएम’च्या माघारीचा फायदा कोणाला?

‘वंचित’, ‘एमआयएम’च्या माघारीचा फायदा कोणाला?

रणजित जोशी : सोलापूर
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज देखील पात्र ठरला होता, पण त्यांनी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता महायुतीचे उमेदवार राम सातपुते व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात थेट सामना पहायला मिळणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून एमआयएमने देखील उमेदवार न देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. तर अनेक अपक्षांनी सोमवारी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. संविधान वाचवण्यासाठी मी उमेदवारी अर्ज मागे घेतला. या उमेदवारीमुळे भाजपचा खासदार सोलापुरातून दिल्लीत गेला असता. माझ्या हातात बंदूक दिली असली तरी त्यात गोळ्या नव्हत्या. काही कार्यकर्त्यांची फळी स्वार्थी असून त्यात काहीजण ब्रोकर आहेत, असे राहुल गायकवाड यांनी एका व्हीडीओत म्हटले आहे.

वंचित, महाविकास आघाडी व महायुती या तिन्ही उमेदवारांमध्ये तिरंगी फाईट होईल, अशी शक्यता होती. पण, त्यांनी माघार घेतल्याने निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला आहे. वंचितची माघार कोणासाठी फायद्याची ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एमआयएम पक्षानेही सोलापूर लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या या निर्णयाचा कोणाला फायदा होणार, याची चर्चा सोलापूर लोकसभा मतदारसंघात होत आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार आहेत. ‘एमआयएम’कडून उमेदवारी दिली तर जवळपास चाळीस ते पन्नास टक्के मुस्लिम मते या पक्षाला मिळण्याची शक्यता होती, मात्र ऐनवेळी लोकसभा निवडणुकीतून एमआयएम पक्षाने माघार घेतल्याने त्याचा फायदा काँग्रेस की भाजपला होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील बराच मुस्लिम समाज हा काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांसह एमआयएम पक्षातील कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने उमेदवारी देणे म्हणजे भाजपला मदत करणे होय. त्यामुळे उमेदवार देऊ नये, अशी मागणी केली होती. त्याचा विचार करून ‘एमआयएम’चे जिल्हाध्यक्ष फारूख शाब्दी यांनी वरिष्ठ पक्षश्रेष्ठींशी बोलून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, एमआयएम पक्षातील काही नेत्यांनी माजी आमदार रमेश कदम यांना उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या, मात्र पक्षातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याने अखेर पक्षाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना होईल अशी चर्चा आहे, मात्र या मतदारसंघातील काही मुस्लिम समाज हा भाजपसोबत आहे. त्यामुळे बरीच मते ही भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाचे सर्वाधिक मताधिक्य कोणाला मिळणार, यावरच लोकसभेचे बरेच गणित अवलंबून राहणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अक्कलकोट आणि शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने या मतदारसंघातील मुस्लिम मतदारांना आपल्याकडे करण्यासाठी विविध डावपेच आखले जात आहेत. वंचित आघाडीची मोठी पतपेढी शहर व जिह्यात असून ही मते कोणाला मिळणार यावरही निवडणुकीचे चित्र अवलंबून राहील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR