31.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeलातूरतिरुपती रेल्वे नियमित करण्यात खा. शृंगारेंना अपयश

तिरुपती रेल्वे नियमित करण्यात खा. शृंगारेंना अपयश

खा. ओमराजे निंबाळकर यांच्यामुळे सुरू झाली होती रेल्वे, आश्वासन देऊनही लातूरचे खासदार अयशस्वी

विनोद उगिले
लातूर : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे सोलापूर ते तिरुपती ही साप्ताहिक रेल्वे लातूरमार्गे सुरू झाली खरी; पण ती नियमित करण्याचे आश्वासन देणारे सत्ताधारी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांना मात्र ती नियमित करण्यात अपयश आले असून यामुळे तिरुपती दर्शनासाठी जाणा-या भाविकांना प्रवाशांच्या गर्दीच्या त्रासाबरोबरच अधिकचा आर्थिक भारही सोसावा लागत आहे.
धाराशिव व लातूर जिल्ह्यातून तिरुपती दर्शनासाठी जाणा-या भाविक भक्तांची संख्या लक्षात घेऊन खासदार झाल्यापासून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे प्रयत्नशील होते. त्यांनी या प्रश्नी सातत्याने प्रयत्न केले. या रेल्वेसाठी त्यांनी रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या एका बैठकीत ही मागणी लावून धरत या बैठकीसाठी उपस्थित असलेले लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे व सोलापूर रेल्वे विभागांतर्गत बैठकीसाठी उपस्थित असलेल्या खासदारांना सोबत घेत बैठकीतून बाहेरही पडले होते.
 जोपर्यंत रेल्वे सुरू केली जाणार नाही, तोपर्यंत बैठकीला आम्ही खासदार उपस्थित राहणार नाही, अशी ताठर भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेनंतर सोलापूर रेल्वे विभागाने धाराशिव व लातूर रेल्वे स्थानक येथे गाडीच्या देखभाल दुरुस्तीची, पीट लाईनची सुविधा नसल्याने प्रायोगिक तत्त्वावर सोलापूर ते तिरुपती ही स्पेशल रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोलापूर-तिरुपती-सोलापूर प्रत्येक गुरुवारी निघून शुक्रवारी तिरुपतीला पोहोचते आणि याच मार्गे पुन्हा शनिवारी सोलापूरला येत होती. सोलापूर, कुर्डुवाडी, बार्शी, धाराशिव, लातूर, उदगीर, बीदर, गुलबर्गा, रायचूर, गुंतकल तिरुपती अशा दोन रेल्वे  सुरू आहेत.
या रेल्वेतील दर तीन महिन्यांनी प्रवासीसंख्या लक्षात घेऊन वाढीव फे-या मंजूर केल्या जातात. ० नंबरपासून सुरू झालेली रेल्वे ट्रेन ऑन डिमांड म्हणजे स्पेशल रेल्वे म्हणून चालवली जात आहे. याचे दर नियमित रेल्वेला १.०० रु. तिकिट असेल तर याला १.३० पैसे असे दर मोजावे लागतात. कारण ही स्पेशल कॅटेगिरीत चालते. या दोन्ही रेल्वेचे एकच रॅक असून तीन दिवसांत सोलापूर-कुर्ला तर पुढे सोलापूर-तिरुपती अशी चालते व एक दिवस सोलापूर येथे मेन्टेनस केले जाते. धाराशिव व लातूर येथे पीट लाईन नसल्यामुळे ही गाडी फिरवून चालवली जाते. या रेल्वेला लातूरकरांचा मिळत असलेला प्रतिसाद, वाढत्या गर्दीचा त्रास व सोसावा लागत असलेला अधिकचा आर्थिक भार पाहता ही गाडी नियमित करण्याचे आश्वासन देणारे सत्ताधारी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी ही रेल्वे नियमित करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. मात्र यात त्यांना अपयश आल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR