नांदेड: नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने ‘युतीधर्मा’चे पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा धर्म पाळणार असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना पूर्ण पाठिंबा देऊन निवडून आणणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ही संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना आ. चिखलीकर म्हणाले की, महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली असून, त्यामध्ये नांदेड विधान परिषदेची जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी आपली सविस्तर चर्चा झाली आहे. महायुतीचा हा निर्णय मान्य करून आम्ही अमरनाथ राजूरकर यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करू.
या भूमिकेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे महायुतीतील अंतर्गत बंडखोरीची शक्यता मावळली असून, निवडणुकीच्या रिंगणात भाजपची स्थिती अधिक मजबूत झाली आहे.
या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पक्षाचे नेते तथा खासदार अशोक चव्हाण, महायुतीचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, शंकर पाटील गोरेगावकर, चैतन्य बापू देशमुख, शिवराज पाटील होटाळकर, रावणगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत महायुतीची एकजूट दर्शवण्यात आल्याने नांदेडच्या राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले आहे.
















