नवी दिल्ली : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस ओटीटी विनर एल्विश यादव मोठ्या अडचणीत आला आहे. नोएडात झालेल्या रेव्ह पार्टीत विषारी सापांच्या विषाद्वारे नशा करण्यात आली. या प्रकरणात एल्विशचे नाव आले आहे. रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष आणल्याचा आरोप एल्विशवर आहे. याप्रकरणी एल्विशवर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, भाजप खासदार मनेका गांधी यांनीही एल्विशच्या अटकेची मागणी केली असून, हा माणूस टीआरपीसाठी काहीही करायला तयार होतो, अशी टीका त्यांनी केली आहे.
मनेका गांधी म्हणाल्या की, एल्विश निर्दोष असेल, तर तो फरार का झाला? त्याच्यावर आमची आधीपासून नजर होती. तो गळ्यात साप टाकून व्हीडीओ शूट करायचा आणि सापांची विक्रीही करायचा. हे दुर्मिळ साप बाळगणे कायद्याने गुन्हा आहे. याप्रकरणी सात वर्षांपर्यंतची शिक्षेची तरतूद आहे. हा माणूस टीआरपी वाढविण्यासाठी काहीही करायला तयार असतो. त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी मनेका यांनी केली आहे.
काय प्रकरण आहे?
नोएडा पोलिसांनी रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याच्या आरोपाखाली पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणी बिग बॉस ओटीटी सीझन २ चा विजेता एल्विश यादव याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांकडून नऊ सापांची सुटका करण्यात आल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले. हे लोक गुरुवारी सेक्टर-५१ मधील बँक्वेट हॉलमध्ये रेव्ह पार्टीसाठी जमले होते. पोलिसांनी सांगितले की, पीपल फॉर अॅनिमल्स (पीएफए) ने यादव आणि इतर सहा जणांविरुद्ध सापाच्या विषासह रेव्ह पार्टी केल्याप्रकरणी तक्रार केल्यानंतर, वन्यजीव संरक्षण तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.