नांदेड: नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी परिसरात गुरुवारी रात्री अज्ञात कारणावरून झालेल्या एका भीषण हल्ल्यात एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्जुन तातेराव हंबर्डे (रा. विष्णुपुरी) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणात चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी अर्जुन हंबर्डे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अर्जुन गंभीर जखमी झाला होता. हल्लेखोरांनी त्याला चाकूने भोसकले होते, ज्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी तातडीने विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान अर्जुनचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराची पाहणी केली. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चार जणांनी मिळून अर्जुनवर एवढा टोकाचा हल्ला का केला आणि यामागे काही जुने वैमनस्य आहे का, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. या प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी केली जात असून, लवकरच या हत्येमागचे गूढ उकलले जाईल, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
















