मुंबई : प्रतिनिधी
नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्यातील चार मंत्र्यांचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा खळबळजनक दावा करत प्रकरणाला नवे वळण दिले आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खरातला आधीच अटक करण्यात आली आहे.
नाना पटोले म्हणाले की, अशोक खरातकडून सगळी माहिती गोळा केल्यानंतर त्याला मारून टाकले जाईल. विधानसभेतही बोललो. या खरात प्रकरणात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ४ मंत्र्यांचा समावेश आहे. याबाबत पत्र सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. या चारही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची आमची मागणी आहे.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राहिलेली नाही. त्यामुळे राजकीय गुंड असतील किंवा भोंदूबाबा असतील हे समोर येत आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने हे सगळे घडत आहे. राज्यात भीती नावाचा प्रकार संपला आहे. त्यामुळे अशा घटना यापुढेही महाराष्ट्रात सुरू राहतील, असा आरोप पटोले यांनी केला आहे.
दरम्यान, नाना पटोले यांच्या दाव्यानंतर अशोक खरात प्रकरणात गुंतलेले ते चार मंत्री कोण, यावरून राजकीय चर्चांना उधाण आले असून या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा बनाव करून अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणा-या खरातचे काळे कारनामे आक्षेपार्ह व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर चव्हाट्यावर आले, ज्यामुळे पीडित महिलांसह फसवणूक झालेले व्यावसायिकही आता तक्रारीसाठी पुढे सरसावले आहेत.

