Homeमहाराष्ट्रआता निराधारांना मिळणार घरबसल्या डिजिटल हयात प्रमाणपत्र

आता निराधारांना मिळणार घरबसल्या डिजिटल हयात प्रमाणपत्र

मुंबई : प्रतिनिधी
निराधार लाभार्थ्यांना हयातीचे दाखले सादर करण्यासाठी होणारी हेळसांड लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने आधार आधारित डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रस्तावास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता निराधारांना ‘बेनिफिशिअरी सत्यापन अ‍ॅपद्वारे’ घरबसल्या स्वत:चा हयातीचा दाखला उपलब्ध होणार आहे.
राज्यपुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्तिवेतन योजना, त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन अशा विविध योजना सामाजिक विशेष सहाय्यातून राबवल्या जातात. त्यांना आधार आधारित डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ‘बेनिफिशिअरी सत्यापन अ‍ॅप’चा उपयोग होणार आहे.

या लाभार्थ्यांना दरवर्षी १ एप्रिल ते ३० जून दरम्यान हयातीचे दाखले सादर करावे लागतात. त्याशिवाय त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. निराधार, अपंगांना यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते तसेच त्यांची हेळसांड होते. वेळ व पैसाही खर्च होतो.

राज्य सरकारने ७ मे २०२६ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना ‘बेनिफिशिअरी सत्यापन अ‍ॅप’द्वारे डिजिटल हयात प्रमाणपत्र ग्रा धरण्याचा आदेश जारी केला. या आदेशानुसार आधार आधारित हयातीचा दाखला सेतू, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत स्तरावरील संग्राम केंद्रावर ‘बायोमेट्रिक’ किंवा ‘फेस आयडेंटिफिकेशन’ सुविधा उपलब्ध करून लाभार्थ्याचे हयात प्रमाणपत्र ग्रा धरता येणार आहे तसेच लाभार्थ्यांनी स्वत: ‘बेनिफिशिअरी सत्यापन अ‍ॅप’द्वारे डाऊनलोड केलेले प्रमाणपत्रही ग्रा मानले जाणार आहे.

प्रशिक्षण मिळणार
आधार आधारित डिजिटल हयात प्रमाणपत्राचे प्रशिक्षण सेतू, आपले सरकार केंद्र, ग्रामपंचायत स्तरावरील संग्राम केंद्रावरील कर्मचा-यांना देण्यासाठी मास्टर ट्रेनर म्हणून जिल्हा समन्वयक तथा तांत्रिक अधिकारी रवींद्र घावटे यांची नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

‘बेनिफिशिअरी सत्यापन अ‍ॅप’द्वारे प्रमाणपत्र
लाभार्थ्यांनी ‘बेनिफिशिअरी सत्यापण अ‍ॅप’ तसेच ‘आधार फेस आरडी’ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. त्यामध्ये आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी. ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याची निवड करून ‘बेनिफिशिअरी व्हेरिफिकेशन’ हा पर्याय निवडावा. ओटीपी सादर करून चेहरा ओळख ‘फेस कॅप्चर’ किंवा बोटाच्या ठशांद्वारे पडताळणीचा पर्याय निवडावा. त्यानंतर निवडलेल्या पर्यायाच्या आधारे हयात प्रमाणपत्र डिजिटल पर्याय निवडून बोटाचे ठसे किंवा चेहरा पडताळणी करावी व प्रमाणपत्र डाऊनलोड करावे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR